दिवाळी सणाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिण भावला ओवाळते, त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते. या सणाला विशेष महत्त्व आहे. भाऊ बहिणीच्या या सणामागे एक कथा आहे. ही कथा आजही ऐकवली जाते. भाऊबीजेच्या सणाची खरी सुरुवात झाली ती यम आणि यमी पासून. यमाची बहिण यमी हिने त्याला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. पण बहिणीची ही विनंती यमाने मात्र वारंवार टाळली. ‘आपण प्राण हरतो. लोकांचा माझ्या नावानेच थरकाप उडतो. मी जिथे जातो तिथे कर्दनकाळ म्हणून उभा ठाकतो. मला कोणीही घरी येण्याचे आमंत्रण देत नाही मग यमी मात्र मला घरी का बोलावत आहे’ असा प्रश्न यमाला पडला. ‘ज्याच्या दारात पाऊल ठेवतो त्याचे प्राण मी हरण करतो जर मी यमीच्या घरी गेलो आणि तिच्या पतीचे प्राण मी घेऊन गेलो तर…’ असे नाना विचार त्याचा मनात आले. त्यामुळे यमाने मात्र आपल्या बहिणीच्या घरी जाणे टाळले. शेवटी यमीने वारंवार आग्रह करून अखेर कार्तिक शुक्ला पक्षदिनी यम आपल्या बहिणीकडे गेला. भाऊ घरी आल्याने यमीने खुश होऊन त्याची पूजा केली, औक्षण केले. त्याला पंचपक्वान्न खाऊ घातले. बहिणीच्या या सेवेने यम खूपच खूश झाला. बहिणीच्या सेवेने संतृष्ट झालेल्या यमाने यमीला वर मागायला सांगितला. तेव्हा या दिवशी जी बहिण आपल्या भावचे औक्षण करेल त्या भावाला मृत्यूचे भय कधीच नसेल असा वर यमीने मागितला. तसेच यमीच्या आदरतिथ्याने खूश होऊन यमाने यमीला भेटवस्तू देखील दिली. त्या दिवसापासून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी भावाला ओवाळण्याची प्रथा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा