ताप आल्यामुळे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना १२ दिवसांपूर्वी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाकडून सोमवारी जारी करण्यात आलेल्या मेडीकल बुलेटिनमध्ये जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले आहे. त्यांना आवश्यक प्रतिजैविकी, श्वासोच्छवासाठी सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यांच्या तब्येतीवर लक्ष देण्यासाठी इंग्लंडमधून एक तज्ज्ञ डॉक्टरही येथे आले असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. पण दुसरीकडे  जयललिता यांच्या तब्येतीबाबत आजपर्यंत सविस्तर माहिती द्यावी, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. त्यानंतर सकाळपासून जयललिता यांचा रुग्णालयातील ऑक्सिजन मास्क घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रुग्णालयात बेडवर झोपलेल्या या जयललिताच असल्याचा दावा केला जात आहे.  द्रमुकचे अध्यक्ष करुणानीधी यांनी त्यांचा रुग्णालयातील फोटो देण्याची मागणी केल्यानंतर हा फोटो खूपच व्हायरल झाला आहे. पण हा फोटो जयललिता यांचा नसून तो पेरू देशातल्या एका रुग्णालयातला असल्याचे ‘द न्यूज मिनिट’मध्ये म्हटले आहे. रुग्णालयाच्या वेबसाईटवर खूप आधिपासूनच हा फोटो आहे आणि केवळ प्रसिद्धीसाठी या फोटोंचा गैरवापर केला गेल्याचे म्हटले आहे. २२ सप्टेंबरला प्रकृती खराब असल्याच्या कारणावरून जयललिता यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अम्मा समर्थकांनी रुग्णालयाच्या बाहेरच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी पूजा पाठ करायला सुरूवात केली होती.

Story img Loader