रशियातल्या एका व्यक्तीनं बाथटबभरून चिल्लर देऊन चक्क आयफोन विकत घेतल्याची बातमी काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. अनेकांना हा प्रकार काहीसा वेगळा आणि हास्यास्पद वाटला. एवढी चिल्लर घेऊन एखादा व्यक्ती दुकानात गेलाच कसा असा प्रश्न अनेकांना पडला. त्याच्याजवळ असलेला मोठा टब आणि त्यात असलेली नाणी पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. या कृतीमुळे रशियातला तरूण चर्चेचा विषय बनला. मात्र चिल्लर देऊन फोन खरेदी करण्यामागचं या तरुणाचं कारण खूपच वेगळं आणि विचार करण्यासारखं होतं.
हा तरुण रशियातला प्रँकस्टार आहे. सुट्ट्यापैशांकडे पाहण्याचा इथल्या लोकांचा दृष्टीकोन खूपच चुकीचा आहे. अनेक दुकानदार सुट्टे पैसे स्वीकारत नाही. जो ग्राहक सुट्टे पैसे देतो त्याला सुविधा देणंही दुकानदार नाकारतात. हाच दृष्टीकोन आम्हाला बदलायचा होता म्हणून आम्ही नाणी देऊन मोबाईल विकत घेतला असं या प्रँकस्टारनं सांगितलं. आयफोनसाठीची जवळपास ८० हजारांहून अधिकची रक्कम त्यानं या स्वरुपात आणली होती. ही चिल्लर मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना दोन तास लागले. पण अखेर या प्रँकस्टारनं आयफोन विकत घेऊन दाखवलाच.