दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला इंडिगो एअरलाइन्सच्या Indigo Airlines कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांनीच इंडिगो एअरलाइन्सवर टिकेची झोड उठवली. सोशल मीडियावर तर मोठ्या प्रमाणात इंडिगो एअरलाइन्सची निंदा केली जात आहे. इंडिगोचे प्रतिस्पर्धी असलेल्या ‘एअर इंडिया’ आणि ‘जेट एअरवेज’नंही शक्कल लढवत इंडिगोवर टीका करण्याची एक संधीही सोडली नाही, तिथे सामान्य माणसं तरी कशी मागे राहतील?

आम्ही फक्त ‘नमस्ते’ करायलाच हात उचलतो; एअर इंडियाची इंडिगोवर उपरोधिक टीका

प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या इंडिगोवर रोहित चौबे नावाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या भन्नाट ट्विटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. मुंबई दिल्ली विमान प्रवासासाठी त्याने इंडिगोकडे मदत मागितली. त्याने दोनदा ट्विट करत इंडिगोकडे मदतीची विनंती केली. बऱ्याच वेळानंतर इंडिगोच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याला उत्तर आलं. ‘आम्ही तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकतो?’ असं इंडिगोकडून त्याला विचारण्यात आलं. त्यावेळी ‘फार काही नाही, पण दुपारच्या विमानाने माझा बॉस दिल्लीत येणार आहे. ज्याक्षणी तो विमानतळावर पाऊल ठेवेल त्याक्षणी त्याची बेदम धुलाई करा.’ असं उपरोधिक ट्विट त्याने केलं. मग काय बघता बघता हे ट्विट सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालं. एअर इंडिया आणि जेट एअरवेजच्या मार्मिक जाहिरातीपेक्षा रोहितचं ट्विट सर्वात भाव खाऊन गेलं.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांकडून राजीव कात्याल नावाच्या प्रवाशाला धक्काबुक्की करण्यात आली. विमानातून उतरल्यानंतर कात्याल यांचा इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. पुढे या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर टीका झाली, हे प्रकरण तापल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या चुकीची माफीदेखील मागितली. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

Story img Loader