जंगलात राहायचं म्हणजे इथे प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे इथे नेहमीच दुबळ्या आणि ताकदवाद प्राण्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. संकटात सापडलेल्या प्रत्येक प्राण्याला आपलं रक्षण स्वत: करावं लागतं. इथे माणसांप्रमाणे कोण कोणाच्या मदतीसाठी धावून येत नाही. पण याच्या पुरेपूर उलट दृश्य पाहायला मिळालं ते आफ्रिकेतल्या एका नेचर पार्कमध्ये.
जुलै ते ऑक्टोबर या काळात ताज्या चाऱ्याच्या शोधात असंख्य जनावरं सेरेगेटीच्या जंगलातून स्थलांतर करत हिरवी कुरणं असलेल्या मसाई मारात पोहोचतात. तेव्हा त्यांची शिकार करण्यासाठी सिंह, मगर, चित्ते घात लावून तिथे बसलेले असतात. जंगलातला हा खेळ पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक आफ्रिकेच्या जंगलात पोहोचतात. इथे आलेल्या अशाच एका पर्यटकाच्या नजरेस खूपच वेगळंच दृश्य दिसलं. पाणवठ्याजवळ आलेल्या एका वाईल्डबीस्टवर मगरीनं हल्ला केला. त्याचे दोन्ही पाय आपल्या जबड्यात पकडून मगर त्याला खेचून पाण्यात नेत होती. त्याचा मृत्यू अटळ होता, शिकारीची ही दृश्य पर्यटक आवासून पाहत होते, पण याचवेळी खेळ पालटला आणि चक्क दोन पाणघोडे त्याच्या मदतीला धावून आले आणि काही सेकंदात त्यांनी मगरीला हुसकावून लावलं.
मगरमिठीतून या प्राण्याची सुटका झाली. जंगलात क्वचितच दिसणारा हा प्रसंग एक पर्यटकानं कॅमेरात कैद केलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहींच्या मते हे पाणघोडे त्या प्राण्याला मदत करत नसून, आपल्या हद्दीत शिरलेल्या मगरींना हाकलवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. आता त्यांचा हेतू काही असला तरी यामुळे एका प्राण्याचा जीव वाचला हे नक्की!