व्हिस्कीच्या एका दुर्मीळ बाटलीला विक्रमी बोली लागली आहे. व्होली ग्रेलची व्हिस्की बाटली जगातील सर्वात महागडी ठरली आहे. या बाटलीला तब्बल ८.०९ कोटी रूपयांची बोली लागली आहे. सोशल मीडियावर या बाटलीची जोरदार चर्चा आहे. एवढ्या महागड्या किंमतीमध्ये विकल्या गेलेल्या बाटलीमध्ये काय आहे ? याची लोकांना उत्सुकता लागली आहे. व्होली ग्रेलची ही बाटली १९२६ च्या मॅकलन वॅलेरियो अदामीची व्हिस्की आहे. कलेक्टर्स या खास बाटलीबाबत फार उत्सुकता होती. कारण ही फार दुर्मीळ बाटली आहे.
वालरियो अदामी आणि पीटर ब्लेक नावाच्या दोन पॉप आर्टिस्टने या व्हिस्कीच्या फार लहान एडिशनचं लेबल डिझाइन केलं होतं. ज्यात २४ बॉटल्स होत्या. यातील १२ बॉटल्स ब्लेकने डिझाइन केल्या होत्या. तर १२ अदामीने डिझाइन केल्या होत्या.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, व्हिस्कीची ही बाटली तब्बल ६० वर्षे जुनी आहे. या व्हिस्कीची निर्मिती १९२६ ते १९८६ दरम्यान करण्यात येत होती. व्हिस्कीचे तज्ज्ञ मार्टिन ग्रीन सांगतात की, ‘या व्हिस्कीला मिळालेल्या किंमतीने मी खूश आहे. ही फार गर्वाची बाब आहे की, व्हिस्कीच्या दुनियेत स्कॉटलॅडने एक नवीन विक्रम कायम केलाय’.