Hongkong Free Air Tickets: हाँगकाँग हे एकेकाळी हनिमून किंवा मित्रांसह बॅचलर पार्टीला जाण्याचं ड्रीम डेस्टिनेशन म्हणून बरंच प्रसिद्ध ठिकाण होतं मात्र करोनानंतर हॉंगकॉंग मधील पर्यटन काहीसं मंदावलं आहे. पर्यटनावर आधारित अर्थव्यस्था असल्याने हॉंगकॉंगने या क्षेत्रातील गेलेली रया परत आणण्यासाठी विविध योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. यातीलच एक भन्नाट ऑफर म्हणजे मोफत विमान तिकिटांचे वाटप. हाँगकाँगचे विमानतळ प्राधिकरण पर्यटकांना ५ लाख मोफत विमान तिकिटे देणार आहे. पुढील वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये या तिकिटांचे वाटप होईल.

करोना नंतर आता हॉंगकॉंगमधील सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशात पुन्हा पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या हेतूने हॉंगकॉंग सरकारने हा मोफत तिकीट वाटपाचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणारा २५४. ८ दशलक्ष डॉलरचा खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी हॉंगकॉंग सरकारने देशांतर्गत विमान कंपनीची तिकिटे खरेदी केली होती.

हाँगकाँग पर्यटन मंडळाचे कार्यकारी संचालक डेन चेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या करोनाचे निर्बंध शिथिल आहेत मात्र एकदा का सरकारने सर्व कोविड-19 निर्बंध काढून टाकण्याची घोषणा केली, की देशात येणार्‍या प्रवाशांसाठी मोफत विमान तिकिटांच्या जाहिरात मोहिमेला सुरुवात केली जाईल.

दरम्यान, मागील महिन्यात, हाँगकाँग सरकारने येणार्‍या पर्यटकांना हॉटेल क्वारंटाईनमध्ये राहण्याचा किंवा हाँगकाँगच्या फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी निगेटिव्ह कोविड चाचणी दाखवण्याचा नियम रद्द केला होता. मात्र आता मागील तीन दिवसात काही प्रवाशांमध्ये कोविड लक्षणे आढळून आली होती.

या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत हाँगकाँगला १ लाख ८४ हजार पर्यटकांनी भेट दिली होती. हे प्रमाण करोना पूर्व काळाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. २०१९ मध्ये एकूण ५६ दशलक्ष लोकांनी हॉंगकॉंगला भेट दिली होती. मात्र दुसरीकडे ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग सर्व्हिस एक्सपेडियाच्या मते, हाँगकाँग ते टोकियोपर्यंतच्या फ्लाइटच्या सर्चमध्ये नऊ पटीने वाढ झाली आहे. आता हाँगकाँगमध्ये येणाऱ्या विमान तिकीट शोधणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशावेळी हा मोफत तिकिटांचा उपक्रम प्रवासी व हॉंगकॉंगसाठी फायद्याचा ठरू शकतो.

Story img Loader