एखादी व्यक्ती मृत्यूशी झुंज देऊन कोमामधून परत शुद्धीवर आली आणि तिच्या आजूबाजूला तिच्या ओळखीचं कोणीच नसेल तर? असाच काहीसा प्रकार घडला कॅनडामध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीसोबत. सध्या जगभरामध्ये या प्रकरणाची चर्चा असून तिच्या प्रियकरावर अनेकजण टीका करतानाचं चित्र दिसत आहे.

बेरी ड्यव्हॅल असं या २५ वर्षीय तरुणीचं नाव आहे. मूळची ऑस्ट्रेलियाची असणारी बेरी ही कॅनडामध्ये वास्तव्यास आहे. येथील एका मोठ्या कंपनीमध्ये ती कामाला आहे. मागील चार वर्षांपासून ती एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र मागील वर्षी ऑगस्टमध्ये तिच्यासोबत असं काही घडलं की तिचं स्वप्नवत वाटणारं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आपल्या एका मैत्रिणीकडे नाईट आऊटला गेली असता तिचा एक भयंकर अपघात झाला. ती इमारतीवरुन खाली पडली. एका अर्धवट बांधण्यात आलेल्या भिंतीवर ती पडली आणि जबर जखमी झाली. रात्रीच्या अंधारात हा अपघात घडला. नजरचुकीमुळे झालेल्या या अपघातात ही तरुणी खाली पडली तेव्हा थेट डोक्यावर आघात झाला आणि ती गंभीर जखमी झाली. तिला हेलकॉप्टरने युनिव्हर्सिटीच्या अलबर्टा हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. तिला रुग्णालयामधील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती आणि तिची अनेक हाडं मोडल्याचं चाचण्यांदरम्यान लक्षात आलं.

बेरी ही जवळजवळ चार आठवडे कोमात होती. डॉक्टरांनी तिच्या आईशी बोलताना बेरीच्या जगण्याची शक्यता अगदी १० टक्के आहे असं सांगितलं होतं. उपचाराच्या पहिल्याच आठवड्यात बेरी वाचवण्याची शक्यता फारच कमी असल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं. सुदैवाने बेरीच्या आई-वडिलांनी तिला लाइफ सपोर्ट सिस्टीमवरुन काढण्यास नकार दिला. तीन आठवड्यांनंतर बेरीच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लगाली. बेरीने मृत्यूवर मात केली. अवघ्या चार आठवड्यांमध्ये ती शुद्धीवर आली. मात्र तिच्यावर काही प्रमाणात अॅनेस्थेशिया प्रभाव होता. तिला हळूहळू सर्व आठवू लागल्यानंतर तिला तिचा फोन देण्यात आला. मात्र तिला फोन देण्यात आला तेव्हा तिला आलेला मेसेज हा तिच्यासाठी फार धक्कादायक होता. मागील चार वर्षांपासून तिच्यासोबत असणाऱ्या तिचा जोडीदार तिला सोडून गेला होता. बेरी त्याच्यासोबतच रहायची. मात्र त्याने तिला सर्व सोशल मीडियावरुन ब्लॉक केलं होतं आणि तो दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होता.

‘द मिरर’शी बोलताना बेरीने यासंदर्भातील अनुभव सांगितला. “मला अखेर बऱ्याच दिवसांनी फोन देण्यात आला. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या डोक्यात त्याला फोन करुन माझ्यासोबत काय घडलं हे ठाऊक आहे का याबद्दल सांगावसं वाटलं. तो मला भेटयाला का आला नाही हे त्याला विचारायचं होतं. मात्र मी माझा फोन घेतला तेव्हा मला एका महिलेकडून मेसेज आला होता. मी त्याच्यासोबत (माझ्या जोडीदारासोबत) असल्याचं सांगितलं. मी त्याला दुसरीकडे घेऊन चाललेय असंही तिने लिहिलं होतं. आता मी, माझा मुलगा आणि तो एकत्र राहतोय. त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करु नकोस,” असं त्या मेसेजमध्ये म्हटलेलं. आपला प्रियकर आपल्याला अशा अवस्थेत सोडून गेल्याचं समजल्यानंतर बेरीला फार वाईट वाटलं. ती मानसिक दृष्ट्या खचून गेली. मात्र तिने स्वत:च्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत केलं.

“मी रुग्णालयामध्ये दाखल झाल्यापासून तो मला भेटायलाही आला नव्हता. तो मला या संकटामध्ये सोडून गेला होता. त्यामुळेच हे नेमकं का घडलं हे मला कळालं नाही,” असंही बेरी म्हणाली. यामधून धक्कादायक बाब म्हणजे करोनामुळे तिच्या पालकांनाही कॅनडामध्ये येता आलं नाही. म्हणून खऱ्या अर्थाने बेरी शुद्धीवर आली तेव्हा ती एकटीच होती. “माझ्यासोबत हे सारं घडलं तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये करोनाची लाट होती त्यामुळे त्यांना देश सोडून येता आलं नाही. माझ्या आई-वडिलांनी सरकारकडून विशेष परवानगी मागितली होती. माझा मृत्यू होईल अशी त्यांना भिती होती त्यामुळे त्यांना मला शेवटचं भेटायचं होतं. मात्र त्यांना नकार देण्यात आला,” असं बेरी म्हणाली.

आपल्याला आपल्या मुलीला भेटता यावं म्हणून बेरीच्या पालकांनी काहीही झालं तरी मुलीला लाइफ सपोर्टवरुन काढू नका असं सांगितलं. याच गोष्टीचा फायदा झाला आणि बेरी यामधून सावरली. मात्र या संकटाच्या वेळी तिचा एक मित्र आणि त्याची आई आठवड्यामधून एकदा तिची भेट घेण्यासाठी आवर्जून यायचे.

सध्या बेरी उपचार घेत असून तिला ट्युमरिक ब्रेन इंजरीचा त्रास आहे. हे म्हणजे नेहमी आपण सतर्क राहिल्यासारखं असतं. आपण अनेक गोष्टींची अती काळजी करु लागतो असा हा आजार आहे. आता यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी बेरी काम करणार असल्याचं सांगते.

Story img Loader