अनेक शाळांत आणि महाविद्यालयात मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कमी वयात लहान मुलांच्या हातात मोबाईल आला की त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, मुलं वाया जातात असं शिक्षकांचं म्हणणं असतं, ते खरंही असतं म्हणा. म्हणून मुलांना शाळेत किंवा कॉलेजमध्ये मोबाईल देऊ नये असं शिक्षक अनेकदा ठणकावून सांगतात. पण हल्लीची मुलं ऐकतात कुठे? आई बाबांकडे हट्ट करून किंवा लपवून फोन घेऊनच जातात. अशा मुलांना धडा शिकवण्यासाठी चीनच्या एका शाळेने अजब शक्कल लढवली. आता जित्याची खोड मेल्याशिवाय जाईना हे शिक्षकांना माहितीय तेव्हा बंदी असूनही शाळेत मोबाईल आणणाऱ्या मुलांची चांगलीच खोड त्यांनी मोडली.
शाळेने या सगळ्या मुलांचे मोबाईल जप्त केले. आता शिक्षक हे फोन जप्त करतील, पालकांना बोलावतील, थोडं लेक्चर वगैरे देतील आणि फोन परत करतील असं विद्यार्थ्यांना वाटलं, पण त्यांना हा गोड गैरसमज शाळेने असा काही दूर केला की बिचारे यापुढे शाळेत मोबाईल आणण्याची स्वप्नातही कल्पना करणार नाही हे नक्की. शाळेने मोबाईल जप्त केलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानात बोलावलं आणि त्याच्या डोळ्यांदेखत त्यांच्या महागड्या मोबाईलचा अक्षरश: चुराडा केला. शाळेतल्या शिपायांनी मुलांसमोर हातोडीने सगळे फोन तोडून टाकले आणि बिचारी मुलं मात्र आपल्या फोनचे तुकडे तुकडे होताना डोळ्यात पाणी आणून बघत बसले. या अजब शिक्षेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.