रेस्टॉरंट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती आणि पदार्थ्यांच्या मेजवाणी देतात. तर काही रेस्टॉरंटमधील पदार्थांची चवच इतकी भारी असते की, पावलं आपसूक तिथे वळतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी लोकं चांगल्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याचे चोचले पुरवण्यासाठी जातात. पण एक रेस्टॉरंट वेगळ्याच कारणाने लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. भुतांच्या वेषात लोकांना जेवण वाढतात. त्यामुळे भुतांचे हावभाव पाहून घास घश्याखाली उतरेल की नाही, असा प्रश्न पडतो. खोट्या भुतांसोबत जेवताना भीती वाटावी यासाठी हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आलं आहे. रेस्टॉरंट रियाध शहरात असून त्याचं नाव शॅडोज ठेवण्यात आलं आहे. आतमध्ये प्रत्येक टेबलाच्या एका खुर्चीवर भूत बसलेलं दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक रेस्टॉरंट दिसत आहे. यात भुतांचा वेष परिधान केलेले वाढपी आणि स्टाफ दिसत आहे. खरं तर त्यांना पाहिल्यावर वातावरण भीतीदायक वाटतं. टेबलावर सांगाडे, कवटी असं ठेवलेलं दिसत आहे. त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये जेवण करणं एक परीक्षाच आहे. या रेस्टॉरंटचा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.
एका रिपोर्टनुसार असे सांगण्यात येत आहे की, जर एखाद्या व्यक्तीने येथे ६ सीट असलेले टेबल बुक केले तर माणसांना बसण्यासाठी फक्त ५ जागा दिल्या जातात. रेस्टॉरंटमध्ये भुतांसाठी नेहमीच एक जागा राखीव असते. यात काही लोक जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात.रेस्टॉरंटमधील वातावरण जरी भीतीदायक असलं तरी घाबरण्यासारखे काही नाही. कारण ही सर्व भुते खोटी आहेत, खुर्च्यांवर बसलेले सांगाडे देखील बनावट आहेत.