शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. जयपूरमध्ये एक घोडा कारच्या काचा फोडून चक्क कारमध्ये शिरल्याची घटना घडली आहे. उन्हाने अंगाची काहीली होत असल्याने अनेकदा माणसालाही अगदी नकोसं होतं. तसंही काहीसं या घोड्याच्या बाबतीही झालं. वेगाने धावत आलेला हा घोडा एकाएकी समोरुन येणाऱ्या गाडीची पुढची काच तोडत आत घुसला. या विचित्र अपघातात कारचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
जयपूरमध्ये एका टांगेवाल्याने आपला घोडा रस्त्यावर दोरीने बांधून ठेवला होता. रविवारी याठिकाणी ४२ डिग्री सेल्सियस तापमान होते. त्यामुळे गर्मीने हैराण झालेला घोडा दोरी तोडून रस्त्यावरुन पळत सुटला. यावेळी त्याच्या तोंडाला बांधलेली चाऱ्याची पिशवी जोरात धावल्याने डोळ्यावर गेली. या पिशवीमुळे घोड्याला पुढचे काहीच दिसेनासे झाले आणि तो आणखी चवताळला. रस्त्यावरुन चालणारे लोक या घोड्याला पाहून घाबरले. घोडा रस्त्यावरुन इकडे तिकडे धावायला लागल्याने त्याला नियंत्रणात आणण्यासाठी लोकांनी त्याच्या अंगावर पाणी फेकले मात्र तो काही केल्या नियंत्रणात येईना.
एखाद्या कार्टून शोला साजेशी असणारी ही गोष्ट रविवारी प्रत्यक्षात घडली आहे. वेगाने धावत आलेला हा घोडा वाटेतील दोन दुचाकीस्वारांनाही धडकला. याचवेळी समोरुन येत असलेल्या एका कारच्या बोनेटला हा घोडा धडकला. कारचालकाला काही समजायच्या आतच कारच्या पुढच्या काचेतून हा घोडा थेट कारमध्ये घुसला. कारच्या काचा फुटल्याने कारचालक आणि घोडा चांगलेच जखमी झाले. याठिकाणी उपस्थित असलेल्यांनी घोड्याला आणि कारचालकालाही कारमधून कसेबसे बाहेर काढले. जखमी झालेला हा घोडा काही वेळाने शांत झाला. त्यानंतर पोलीस आणि पशुवैद्यांना बोलावून घोडयावर उपचार कऱण्यात आले