आपल्याकडून एखाद्याचे चुकून नुकसान झाले तर त्या व्यक्तीला आपणाला नुकसानभरपाई द्यावी लागते. पण एखाद्या व्यक्तीच्या अंगावर चुकून कॉफी सांडली म्हणून कोणाला कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? कदाचित तुमचं उत्तर नाही असं असू शकतं. पण सध्या अशी एक घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये एका महिलेच्या अंगावर चुकून कॉफी सांडल्यामुळे एका कंपनीला तब्बल २४ कोटींची भरपाई द्यावी लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७० वर्षांची अमेरिकन महिला अटलांटाला येथील डंकिन आऊटलेटमध्ये गेली होती. यावेळी तिने कॉफी ऑर्डर केली होती, मात्र कॉफीचे झाकण नीट बसवले नसल्यामुळे महिलेच्या अंगावर कॉफी सांडली आणि तिला गंभीर जखम झाली. या घटनेनंतर महिलेला अनेक महिने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले या उपचारांसाठी तिला जवळपास २ लाख डॉलर खर्च करावे लागले.
हेही पाहा- आकाशातून पडला नोटांचा पाऊस! पैसे गोळा करण्यासाठी पिशव्या घेऊन आले लोक; घटनेचा VIDEO होतोय व्हायरल
त्यामुळे या महिलेने कंपनी विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली. तिच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं, “या घटनेनंतर महिलेचे आयुष्यच बदलून गेले, तिला दिवसातून अनेक वेळा औषध घ्यावे लागते, तिला चालताना, दैनंदिन कामे करतानाही खूप त्रास सहन करावा लागतो. शिवाय हे सर्व अंगावर कॉफी सांडल्यामुळे झाले, जर कॉफीचे झाकण नीट बसवले असते तर ही घटना घडली नसती आणि या महिलेला एवढा त्रास सहन करावा लागला नसता.”
यानंतर न्यायालयीन प्रकरण संपवण्यासाठी कंपनीने तडजोड करण्याची तयारी दर्शवली आणि महिलेला झालेली दुखापत आणि त्रास लक्षात घेता कंपनीने तिला २४.९५ कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. तर ग्राहकांच्या सुरक्षेशी खेळणार्या किंवा सुरक्षेकडे लक्ष न देणाऱ्या हॉटेल आणि आऊटलेटसाठी हा मोठा धडा असल्याचं लोकं म्हणत आहेत. दरम्यान, हे सर्व प्रकरण मिटवण्यासाठी कंपनीने महिलेला ३ मिलियन डॉलर देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एका छोट्याशा चुकीमुळे आऊटलेटच्या मालकाला कोट्यवधी रुपये द्यावे लागल्याचे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.