ऑस्ट्रेलियामधील एका महिलेला हॉटेलमध्ये राहिल्यानंतर चक्क १४०० डॉलर्स म्हणजे जवळपास १ लाख १६ हजार इतके बिल आल्याचे समजते. परंतु, हे बिल तिच्या राहण्याचे किंवा खाण्यापिण्याचे असेल असा तुम्ही विचार करत असाल तर तसे अजिबात नाही. हे भलंमोठं बिल, चक्क हेअर ड्रायर वापरल्याचे आहे, असे पर्थ नाव्ह [perth now] च्या बातमीवरून समाजते. परंतु, केवळ हेअर ड्रायरसाठी एवढे मोठे बिल कसे आकारण्यात आले?
ज्या महिलेबाबत हा सर्व प्रकार घडला, तिला तिचे खरे नाव सांगायचे नसल्याने, तिच्या नावाच्या जागी ‘केली’ या नावाचा वापर केला आहे.
तर केली एका कॉन्सर्टला जाण्याआधी, नोव्हटेल [Novotel] नावाच्या हॉटेलमध्ये एक रात्र राहणार होती. केली कॉन्सर्टला जाण्यासाठी आपल्या हॉटेलच्या खोलीत तयार होत असताना, तिने केसांसाठी हेअर ड्रायरचा वापर केला. परंतु, ती तयार होत असतानाच अचानक, आगीची सूचना देणारा अलार्म वाजला आणि काही क्षणातच तिच्या खोलीच्या दारात अग्निशमन दलाचे कर्मचारी येऊन उभे राहिले. हा सर्व काय प्रकार आहे असे विचारता, तिने वापरलेल्या हेअर ड्रायरमुळे आगीची सूचना देणारा अलार्म चुकून वाजला असे म्हणून ते अग्निशमन दलाचे कर्मचारी तिथून निघून गेले.
हेही वाचा : ऑर्डर केले व्हेज सॅलड; सोबत मिळाली ‘गोगलगाय’ फ्री! किळसवाण्या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या….
हा सर्व प्रकार घडल्यानंतर, केली कॉन्सर्टसाठी निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी तिने हॉटेलमधून चेक आउट केले. परंतु, या सर्व घडामोडीनंतर तीन दिवसांनी तिचे तब्ब्ल १४०० डॉलर्स [१ लाख १६ हजार] इतके पैसे, नोव्हटेल हॉटेलच्या नावाने, बँकेतून वजा झाल्याचे समजले. जेव्हा तिने हॉटेलला फोन करून याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी तिला ही अग्निशमन दलाला बोलावण्याची फी आहे असे सांगितले.
केलीच्या माहितीनुसार, सुरुवातीला नोव्हटेल हॉटेलमध्ये फोन केल्यांनतर कुणीही तिच्याशी बोलण्यासाठी अजिबात तयार नसून, तिला मॅनेजरशीसुद्धा बोलण्यास देत नव्हते. “त्यांनी मला कोणताही इमेल पाठवला नाही. मी जेव्हा हॉटेलमध्ये फोन केला, तेव्हा त्यांनी मला हाच त्यांचा हॉटेलचा नियम असल्याचे सांगितले. मग जर त्या हॉटेलमध्ये कुणी कुठला वाफाळता पदार्थ खात असेल आणि असा अचानक अलार्म वाजला तरीही त्याचे पैसे लावणार का? हा सर्व प्रकार फारच मूर्खपणाचा आहे”, असे केलीने पर्थ नाव्ह [pert now] ला माहिती देताना सांगितले.
सर्व प्रकरणानंतर शेवटी हॉटेलच्या मॅनेजरने केलीला तिचे पैसे [रिफंड] परत केले असल्याचे सांगितले.