How Elastic Rubber Band Is Made Video: जवळपास एक आठवड्यापासून इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ नेमका काय आहे हे आम्हीही बघून पाहायचं ठरवलं आणि आतापर्यंत कधीही न समजलेली एक प्रक्रिया यामध्ये उलगडून पाहायला मिळाली. घरातं एखादं चिप्स, बिस्कीटचं पाकीट फोडलं आणि अर्धवट खाऊन पुन्हा ठेवायचं असेल तर पटकन एखादा रबर बँड लावून त्या पाकिटाला सुरक्षित ठेवता येतं. केसाची वेणी, कपड्यांचे फॅशन हॅक, एखादी सैल पडलेली वस्तू सगळ्या बिघाडांवर एक साधा रबरबँड भन्नाट जुगाडू उपाय करू शकतो. पण अनेक वस्तूंच्या बांधणीत वापरला जाणारा हा रबर बँड मुळात कसा तयार होतो हे तुम्हाला माहितेय का?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये रबरबँड साठी लागणाऱ्या कच्च्या मालापासून ते संपूर्ण निर्मिती प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या रंगांचे रबरबॅंड यामध्ये पाहायला मिळत आहेत. खरंतर ही एवढी लहान वाटणारी वस्तू बनवायला इतके कष्ट लागत असतील हे पाहूनही अनेकजण थक्क झाले आहेत.
@foodexplorerlalit या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बादलीत रबराच्या झाडापासून रस गोळा करताना दाखवण्यापासून हा व्हिडीओ सुरु होतो. व्हिडिओ पुढे जात असताना, आणखी एक माणूस ड्रममध्ये गोळा केलेल्या रसामध्ये रंग टाकताना दिसत आहे. रंग मिसळून झाल्यावर जेव्हा लेटेक्स सुकते तेव्हा एक मोठं मशीन त्यांचे पातळ तुकडे करते, आणि मग आपण दररोज वापरत असलेला रबर बँड तयार होतो.
Video: रबर बँड कसा तयार होतो?
हे ही वाचा<< “अरे तिला असं धर..”, प्रसिद्ध व्लॉगरसह महाराष्ट्रात भररस्त्यात विनयभंगाचा प्रयत्न; ‘त्या’ दोघांनी गळ्यात हात घालून..
इंस्टाग्रामवर सहा दिवसांपूर्वी शेअर केल्यापासून, या व्हिडिओला 28.2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेक कमेंट्स सुद्धा पाहायला मिळत आहेत. एवढ्याश्या गोष्टीला एवढा जास्त वेळ लागत असेल असं वाटलं पण नव्हतं असं काहींनी म्हटलं आहे, तर काहींनी या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. केमिकल प्रक्रिया करत असताना सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना फक्त चप्पल आणि सॅंडो टीशर्ट घालायला दिलंय हे चुकीचं आहे या केमिकल्सचा दर्प इतका तीव्र असतो की तिथे उभं राहायलाही जमणार नाही पण गरज म्हणून हे बिचारे लोक काम असताना त्यांची निदान काळजी तरी घ्यायला हवी, अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.