Escalator Accident Viral Video: सध्या सर्वत्र एस्केलेटर म्हणजेच धावते जिने आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी जेव्हा एस्केलेटर भारतात दाखल झाले तेव्हा एखादी जादू बघावी तसे लोक या जिन्यांकडे पाहायचे. त्यावर पाय टाकताना गोंधळून कित्येकांचं कंबरडं मोडलं असेल याची गिनतीच नाही. पण आता आपल्याला या जिन्यांची हळूहळू सवय होऊ लागली आहे. मॉल, विमानतळ, मेट्रो, रेल्वेस्थानक, अशा अनेक ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी एस्केलेटर लावलेले पाहायला मिळतात. प्रवाशांच्या सोयीसाठी हे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये. पण, हे जितकं सोयीचं आहे तितकंच धोक्याचंही आहे. काही वेळा निष्काळजीपणे एस्केलेटरवर चढणे धोकादायक ठरते. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एस्केलेटरवर चप्पल किंवा कपडे अडकल्यास त्याचे किती वाईट परिणाम होऊ शकतात हे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एस्केलेटरमुळे होऊ शकतो मोठा अपघात

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एस्केलेटरवरून वर जाताना आणि खाली जाताना कोणी निष्काळजीपणा दाखवला तर त्याचे किती घातक परिणाम होऊ शकतात हे दिसत आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे परिस्थिती समजावून सांगण्यासाठी एस्केलेटरवर दोन चप्पल ठेवल्या होत्या. चप्पल एस्केलेटरमध्ये अडकून तुटल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. चप्पल एस्केलेटरच्या आत गेली. ते एस्केलेटर नसून क्रॉसिंग मशीन असल्यासारखे दिसत होते. हा व्हिडीओ शेअर करून खबरदारी न घेतल्यास किती मोठा अपघात होऊ शकतो हे सांगण्यात आले आहे.

व्हिडीओ शेअर करताना व्यक्तीने लिहिले की, “हे भयानक आहे. एस्केलेटर किती धोकादायक असू शकतात ते पाहा. लहान मुले व वृद्धांनी काळजी घ्यावी.” एकाने लिहिले की, “एस्केलेटरवर टोकदार चप्पल आणि सैल कपडे खरोखर धोकादायक असू शकतात.” दुसऱ्याने लिहिले की, “अशा अनेक घटना घडल्या आहेत, अशा परिस्थितीत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.”

(हे ही वाचा : विचित्र अपघात! एक वेळ अन् एकच ठिकाण…१८ सेकंदात घडले नेमके काय; पुण्यातील अपघाताचा LIVE VIDEO )

येथे पाहा व्हिडिओ

एस्केलेटर किती धोकादायक आहे?

एस्केलेटरशी संबंधित अनेक अपघात भारतात होत असतात. अलीकडेच छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एस्केलेटरवर चढताना एका मुलाचा हात घसरून मृत्यू झाला होता. ही पहिलीच घटना नाही; देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये एस्केलेटर अपघाताच्या घटना समोर येत आहेत. जरी देशात एस्केलेटर अपघातांशी संबंधित कोणतीही आकडेवारी नाही, परंतु एका अहवालानुसार, अमेरिकेत दरवर्षी सुमारे १०,००० लोक एस्केलेटरमुळे जखमी होतात आणि त्यांच्यावर उपचार करावे लागतात, असे समोर आले आहे. दरम्यान, तुम्हीही जर अशा धावत्या पायऱ्यांवरून म्हणजेच एस्केलेटरवरून प्रवास करत असाल तर व्यवस्थित उतरा, व्यवस्थित चढा.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How escalators can cause slip and fall accidents video viral pdb
Show comments