गणपती, उन्हाळा, दिवाळी, नाताळ यांसारख्या दीर्घ सुट्ट्यांच्या काळात बाहेरगावी जाताना प्रत्येक सामान्य माणसाला अडचण येते ती रेल्वे तिकीटाची. तीन-तीन महिने आधी रिझर्व्हेशन सुरू होते पण तिकीट काढायला गेले की पुढच्या अर्ध्या तासांत तिकीटे फुल्ल झालेली असतात. मग अशावेळी तिकीट मिळण्याची शेवटची आशा म्हणजे तात्काळ बुकिंग. पण बरेचदा तिथेही नशीब साथ देत नाही. तात्काळ बुकिंग सुरु होताच अगदी पाचव्या मिनिटांला सगळी तिकीटे फुल्ल असतात. असे अनेक वाईट अनुभव प्रत्येकाला येतच असतात पण तात्काळ तिकीट बुक करताना काही साध्या सोप्या गोष्टी केल्यात तर तुम्हाला कन्फर्म तिकीट नक्कीच मिळू शकते.
* पहिली गोष्ट म्हणजे सणासुदी आणि सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची संख्या ही जास्त असते. तेव्हा तिकिट न मिळालेले अनेक जण आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करतात. अशा वेळी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट बुक करताना आधी आपल्या इंटरनेटचा स्पीड तपासून घ्या. कारण इंटरनेटचा स्पीड कमी असेल तर मुळात संकेतस्थळ लोड व्हायला वेळ लागेल तोपर्यंत हजारो लोकांनी आपले प्रयत्न सुरु केलेही असतील. तिकीट बुक करताना शक्यतो इतर संकेतस्थळे उघडू नका. फक्त एकच टॅप उघडून आयआरसीटीच्या संकेतस्थळावर लॉगिन करा.
* तात्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे. तेव्हा काही मिनिटे आधीच संकेतस्थळावर लॉगिन करा.
* ही वेळ सुरू होण्याआधी ज्या प्राथमिक माहितीची आवश्यकता आहे ती आधीच टाईप करून ठेवा म्हणजे वेळ सुरू झाला की तुम्हाला कॉपी पेस्ट करून ती माहिती जलद गतीने तिथे भरता येईल. ती माहिती टाईप करण्याचा तुमचा वेळही वाचेल. तुमचे नाव, प्रवासाचे ठिकाण यासंदर्भातील सगळी माहिती आधीच एका बाजूला लिहून ठेवा. पण याच बरोबर तुम्ही कार्डने पेमेंट करणार आहात हे ही लक्षात ठेवा तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेत तुमच्या कार्डचा नंबर देखील बाजूला लिहून ठेवा. म्हणजे तो बघून टाईप करण्यात नंतर तुमचा वेळ वाया जाणार नाही.
* जास्त वेळ संकेतस्थळावर घालवू नका. लॉगिन करताना पुरवला जाणारा कॅप्चा कोड हा काळजीपूर्वक भरा कारण तो चुकला की नंतर पुरवला जाणारा कॅप्चा कोड हा समजायला अवघड तर असतोच पण त्यात वेळही वाया जातो. जवळपास ६० टक्के लोक कॅप्चा कोड टाकताना चूक करतात आणि इथेच वेळ वाया जातो. जर तुम्ही अधिक वेळ या संकेतस्थळावर असाल तर तुम्हाला पुन्हा एक कॅप्चा कोड पुरवला जातो. तो टाकतानाही चुकी होते तेव्हा तिकीट बुक करताना शक्यतो कमी वेळात प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
* प्रवाशांबद्दल विस्तृत माहिती भरताना तिथे जास्त वेळ व्यतित करू नका. ही माहिती शक्य असेल तितक्या जलद गतीने भरण्याचा प्रयत्न करा. या काही साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत. शेवटी जो जलद गतीने या प्रक्रिया पूर्ण करेल त्यालाच तिकिट मिळेल पण साध्या सोप्या गोष्टींची खबरदारी घेतली तर नक्कीच तात्काळ तिकिट कन्फर्म मिळू शकते.