How To Check Your Name In Voter List : निवडणूक म्हणजे देशाच्या कल्याणासाठी लोकप्रतिनिधी निवडणे होय. पात्र उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडणे हे प्रत्येक मतदाराचे काम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मतदारसुद्धा सज्ज असणे आवश्यक आहे. कोणत्याही निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. पण, तु्म्हाला माहिती आहे का मतदार यादीत नाव कसे तपासायचे? या विषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या.
CEO Maharashtra च्या अधिकृत अकाउंटवरून या संदर्भात माहिती सांगितली आहे. मतदारांना त्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे का नाही, तसेच नोंदणीनंतर आपले नाव प्रत्यक्ष मतदार यादीत आले की नाही, हे वेळोवेळी तपासत राहणे अत्यंत गरजेचे आहे. याविषयी घरबसल्या माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन अॅप सुरू केले आहे. वोटर हेल्पलाइन अॅप काय आहे आणि या अॅपद्वारे मतदार यादीत नाव कसे तपासायचे, जाणून घ्या.
हेही वाचा : भाजपाची भोजपुरी कलाकारांवर मदार; पण पवन सिंहची निवडणुकीतून माघार का?
वोटर हेल्पलाइन अॅप
सुरुवातीला तुम्हाला वोटर हेल्पलाइन हे अॅप तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या अॅपवर लॉग इन करावे लागेल. तुम्ही लॉग इन केले की मुख्य पानावर ‘सर्च युअर नेम इन इलेक्टोरल रोल’ (Search Your Name In Electoral Roll) असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एक पान तुमच्या समोर येईल. येथे तुम्ही तुमच्या मतदार ओळखपत्रासह आपला मोबाइल क्रमांक अपडेट केला असेल तर त्याचा वापर करा आणि मतदार ओळखपत्रावरचा बारकोड किंवा क्यूआर कोड स्कॅन करा. आपल्या मतदार ओळखपत्राशी संबंधित तपशील लिहून किंवा प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी पर्याय दिसतील.
नावाशी संबंधित तपशीलाचा वापर करून नाव शोधण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर पुढच्या पानावर तुम्हाला नाव, आडनाव, वडील किंवा पतीचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाचे नाव हा तपशील भरावा लागेल. त्यानंतर सर्च या बटणावर क्लिक करा. तुम्ही योग्य तपशील भरला असेल तर तुम्हाला लगेच मतदार यादीतील तुमच्या नावाचा तपशील दिसेल. विशेष म्हणजे तुम्ही हा तपशील व्हॉट्सअॅप, फेसबूक, मेल, एक्स किंवा इतर ठिकाणी शेअर करू शकता किंवा डाउनलोड करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर मतदार यादीत तुमचे नाव शोधायचे असेल तर वेळ घालवू नका आणि या अॅपच्या मदतीने लगेच माहिती मिळवा.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या CEO Maharashtra या अधिकृत युट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रत्येक निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. या व्हिडीओतून मतदार यादीत नाव कसे तपासायचे, तुमचा मतदारसंघ, भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्र कसे शोधायचे याची माहिती मिळते. मतदार याद्या दरवर्षी अद्ययावत केल्या जातात, त्यामुळे प्रत्येक आगामी निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक नागरिकाने दरवर्षी मतदार यादीत आपले नाव तपासणे आवश्यक आहे.”