Fake paneer test by content creator Video: ६.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या कन्टेट क्रिएटर अ‍ॅपल तिवारीने डॉमिनोज, मॅकडोनाल्ड्स व बर्गर किंग यांसारख्या फास्ट फूड चेनमध्ये वापरले जाणारे पनीर बनावट आहे का हे शोधण्याच्या प्रयत्न केला. या प्रयत्नाचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. ‘अवश्य पाहा! अलीकडेच, मी पनीरची गुणवत्ता तपासण्यासाठी टॉप ३ फास्ट फूड आउटलेट्सना भेट दिली. मला जे आढळले, ते धक्कादायक होते!’ अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिली. या व्हिडीओने सध्या ऑनलाइन धुमाकूळ घातला आहे.

आयोडीन टिंक्चरची बाटली घेऊन, तिवारी एकामागून एक तीन दुकानांमध्ये जाते. तेथे ती डॉमिनोज- पनीर मखानी पिझ्झा, मॅकडोनाल्ड्स- मॅकस्पायसी पनीर बर्गर व बर्गर किंग्ज- पनीर किंग मेल्ट अशा पनीर डिशेस ऑर्डर करते. दर वेळी ती पाण्याने ताटातील पनीरचे तुकडे धुते, टिश्यू वापरून ते सुकवते, त्यांचे लहान तुकडे करते आणि त्यावर आयोडीन शिंपडते. जेव्हा ते पनीरचे तुकडे निळे-काळे होतात, तेव्हा ती हे “बनावट पनीर!” असल्याचे सांगते. ती घोषित करते, “बनावट पनीर = गंभीर आरोग्य समस्या”, असा इशारा ती देते आणि तिच्या फॉलोअर्सना “नकली (बनावट) पनीरला नाही म्हणा” असे आवाहन करते.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/p/DHn_2NDPCRg/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=728bba59-7788-42de-9e79-8d0122ae346b

बनावट पनीर हे स्टार्च, व्हेजिटेबल फॅट्स किंवा कृत्रिम दुधाच्या घन पदार्थांचे मिश्रण असते आणि ते खऱ्या, मलईदार दुधापासून बनवलेल्या पदार्थांसारखे दिसते. त्यात खऱ्या पनीरसारखे पौष्टिक फायदे नसतात आणि अनेकदा त्यात हानिकारक पदार्थ असू शकतात.

अ‍ॅपल तिवारी या तिच्या टेस्टमध्ये आयोडीन टिंक्चर चाचणी करते. ही एक कायदेशीर युक्ती आहे, जी स्टार्चच्या उपस्थितीत पनीर निळा-काळा करते. हे कच्चे पनीर तपासताना भेसळ असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. तथापि, अ‍ॅपल तिवारी स्वयंपाकघरातून थेट आणलेल्या कच्च्या पनीरची नाही, तर तळलेल्या फास्ट फूड पॅटीजची चाचणी करीत होती.

जसजशी व्हिडीओला लोकप्रियता मिळू लागली, तसतसे या व्हिडीओने ‘मॅकडोनाल्ड’चे लक्ष वेधून घेतले. या पोस्टवर मॅकडोनाल्डने उत्तरादाखल कमेंटमध्ये लिहिले, “पनीरच्या गुणवत्तेबाबतच्या कोणत्याही खोट्या दाव्यांचे आम्ही जोरदार खंडन करतो. आम्ही वापरत असलेल्या पनीरची गुणवत्ता पूर्णपणे दुग्धजन्य पदार्थांवर आधारित आहे आणि ती खऱ्या दुधापासून बनवलेली आहे. त्याशिवाय आम्ही जागतिक दर्जाच्या मान्यताप्राप्त आणि अप्रूव्ह पुरवठादारांकडून पनीर खरेदी करतो.” त्याशिवाय ‘मॅकडोनाल्ड्स’ने पुढे लिहिले की, आम्ही नेहमीच खरे अन्न देतो आणि तुम्ही वापरत असलेली मानक चाचणी पद्धत केवळ कच्च्या मालासाठी डिझाइन केलेली आहे.

आमच्या बर्गरच्या पॅटीबद्दल बोलायचे झाले, तर कोणताही स्टार्च कोटिंग प्रक्रियेतून येतो आणि तो केवळ पॅटीच्या पृष्ठभागावर असतो. या चुकीच्या माहितीने तुम्ही दिशाभूल होऊ देऊ नका, अशी आमची विनंती आहे. अधिक माहितीसाठी, कृपया बायोमधील लिंकला भेट द्या, जिथे आम्ही आमच्या कच्च्या पनीरवर आयोडीनची चाचणी केली आहे.

‘डॉमिनोज’नेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून हा दावा फेटाळून लावला. “सोशल मीडियावरही प्रसारित होणाऱ्या डोमिनोज झिंगी पार्सलमध्ये पनीर (कॉटेज चीज) वापरण्याशी संबंधित सोर्स व्हिडीओमध्ये केलेल्या आरोपांना ज्युबिलंट फूडवर्क्स जोरदारपणे नाकारते. कंपनी स्पष्ट करू इच्छिते की, आमच्या सर्व खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे पनीर १००% दुग्धजन्य पदार्थांवर आधारित आहे,” असे ‘डॉमिनोज’ने निवेदनात म्हटले आहे.

“कंपनी हे देखील स्पष्ट करू इच्छिते की, जेव्हा स्टार्च/कणकेच्या संपर्कात आलेल्या पनीरवर आयोडीन चाचणी केली जाते, तेव्हा संबंधित रासायनिक अभिक्रियेमुळे उघड्या पृष्ठभागाचा भाग निळा/काळा रंगात बदलतो. आयोडीन चाचणी ही स्टार्चची उपस्थिती शोधण्यासाठी एक व्यापकपणे स्वीकृत गुणात्मक पद्धत आहे; परंतु पनीरची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी ती वैध वैज्ञानिक चाचणी नाही. व्हिडीओ निर्मात्याने केलेल्या टिप्पण्या दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि कंपनी व्हिडीओ निर्मात्याविरुद्ध कायदेशीर पर्याय शोधत आहे,” असेही त्यात म्हटले आहे.

इन्स्टाग्राम युजर्सनेही यावर आपल्या प्रतिक्रिया देत कमेंट्स केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “मॅडम, तुम्ही कोर्ट केस कराल का? तुम्ही ज्या पद्धतीने चाचणी करीत आहात ते चुकीचे आहे – हे मॅरीनेट केलेले चीज आहे – जेव्हा ते तळलेले आणि मॅरीनेट केले जाते तेव्हा चीज तेल आणि मॅरीनेट शोषून घेते. म्हणूनच रंग काळा झाला. जर तुमच्यात हिंमत असेल, तर त्यांना चीजचा नमुना देण्यास सांगा आणि मग तुम्ही चाचणी करू शकता. बनावट चाचणी दाखवून लोकांना फसवू नका.”

दुसऱ्या युजरने कमेंट करीत लिहिलं, “अशिक्षित इन्फ्लूएन्सर ही चाचणी तेल नसलेल्या स्वच्छ पनीरवर करावी लागते. ते पनीर तेलात तळलेले असते, म्हणूनच ते रसायन तेलातील स्टार्चशी प्रतिक्रिया देते… प्रत्येक खरे पनीर जर तेलात तळलेले असेल, तर ते या चाचणीत अपयशी ठरेल.”

तर अनेकांनी तिच्यावर विश्वास ठेवला, तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि दुकानांमध्ये पनीर-आधारित बर्गर न खाण्याची शपथ घेतली.