आपल्याला भूक लागेल असते तेव्हा झटपट, म्हणजे अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होणारी मॅगी बनवून आणि खाऊन आपण मोकळे होतो. अगदी हातात वेळ असेल तर आपल्या आवडीनुसार त्यामध्ये कांदा, टोमॅटो, सिमला मिरची अशा अतिरिक्त गोष्टी टाकून त्याला थोडा तडका दिला जातो. परंतु आपण घराबाहेर असू तर पटकन पाणीपुरी, दहीपुरी यासारखे चाट पदार्थ खाल्ले जातात. मात्र सध्या सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये या दोन्ही पदार्थांना, म्हणजेच मॅगी आणि चाटला एकत्र करून एका नवीन पदार्थाचा अविष्कार करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @gouls_kitchen_by_tanvigor नावाच्या अकाउंटने ही ‘मॅगी कटोरी चाट’ची रेसिपी शेअर केली आहे. यामध्ये, सुरवातीला मसाला न घालता शिजवलेल्या मॅगी नूडल्स, चहाच्या गाळण्यामध्ये घालून त्याला एका वाटीसारखा आकार दिला आहे. आता गाळण्यामध्ये नूडल्स तसेच ठेऊन तेलामध्ये तळून घेतल्या आहेत. नंतर बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो एका वेगळ्या वाटीमध्ये घेऊन त्यात लाल तिखट, चाट मसाला, हिरवी चटणी घालून सर्व मिश्रण एकत्र मिसळून घेतले आणि तळून कुरकुरीत झालेल्या नूडल्समध्ये घातले आहे. यावर शेवटी दही, हिरवी चटणी आणि शेव घालून, मॅगी कटोरी चाट बनवल्याचे आपण पाहू शकतो.
हेही वाचा : Recipe : वरणाला द्या राजस्थानी तडका; झटपट तयार होणाऱ्या आंबट-गोड डाळीची रेसिपी पाहा….
अर्थातच हा रेसिपी व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अनेकांचे याने लक्ष वेधून घेतले आहे. काहींना ही रेसिपी फार आवडली आहे तर काहींनी याला फारशी पसंती दिली नसल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांच्या या भन्नाट रेसिपीवर काय प्रतिक्रिया आहेत पाहा.
“खरंच वेगळी रेसिपी आहे. करून बघायला हरकत नाही.” असे एकाने म्हंटले आहे. “पहिल्यांदाच मॅगीसोबत बनवलेला फ्यूजन पदार्थ आवडला आहे.” असे दुसऱ्याने लिहिले आहे. “मॅगीसोबत काय वाट्टेल ते करू लागले आहेत” अशी तिसऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. चौथ्याने, “कृपया मॅगीला मॅगीच राहूद्या” असे सांगितले आहे. तर शेवटी पाचव्याने, “ही रेसिपी हॉटेलवाल्यांना दिसली नाही पाहिजे. नाहीतर फुकटचे १५० रुपये घेतील या सोप्या पदार्थाचे” असे लिहिले आहे.
@gouls_kitchen_by_tanvigor नावाच्या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ६३.३ मिलियन इतके व्ह्यूज आणि ७७४K इतके लाईक्स मिळाले आहेत.