अनेकदा आपल्याला गुगलवर काही माहिती शोधायची असल्यास नेमके काय आणि कसे सर्च करावे तेच आपल्या लक्षात येत नाही. मग त्यातल्या त्यात जवळ जाणाऱ्या शब्दांवरुन आपण आपल्याला हवा असलेल्या गोष्टी शोधतो. मात्र त्यानंतर आपल्याला हवे ते मिळेलच असे नाही. गुगलवर कोणतीही गोष्ट करताना हजारो रिझल्ट्सची यादी समोर येते. असं आपल्यासोबत नेहमीच घडतं. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपल्याला अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठीण जातं आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. बर्याचवेळा निरनिराळ्या प्रकारची माहिती गुगलवर आपण शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी महत्त्वाचा वेळ वाया जातो. अशावेळी कंटाळा येऊन काम लांबत जातं. आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल आपल्याला मदत करतं आणि परिणामी आपला वेळही वाचतो. गुगलवर माहिती शोधताना काही सोप्या पद्धती अर्थात कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो. त्यामुळे बराच त्रास आणि वेळ वाचू शकतो.
१. आपल्या प्रश्नामध्ये ‘ +’ चिन्हाचा वापर करावा : समजा गुगलवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (उदा: विन्डोज ८ चा इतिहास) शोधायचा असल्यास गुगलवर ‘ Windows8 + History ’ असे सर्च केल्यास गुगल हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.
२. आपल्या प्रश्नामध्ये ‘ – ’ चिन्हाचा वापर करावा : समजा जर आपणास गुगलवर ‘sachin’ असे शोधायचे असेल. पण येणार्या यादीमध्ये ‘sachin tendukar’ च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगलला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर ‘sachin -tendukar’ असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल येणार्या उत्तरामध्ये ‘tendukar” हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.
३. आपल्या प्रश्नामध्ये ‘ ~ ’ चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादी माहिती शोधताना येणार्या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखील गुगल दाखवितो. त्यामुळे हे चिन्ह जरुर वापरावे.
४. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीही एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगलवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो. उदा. ‘ http://www.facebook.com mobile’ असे दिल्यास गुगल फक्त http://www.facebook.com वर mobile हा शब्द शोधेल.
५. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असल्यास : आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगलवर त्या शब्दाच्या आधी ‘ define: ‘ असे दिल्यास गुगल त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ‘Define: Hard Disk’ असे शोधल्यास गुगल ‘ Hard Disk ‘ या शब्दाचा अर्थ सांगणार्या वेबसाईटची यादी देईल.
६. जसाच्या तसा शब्द शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगलवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच ” ” याचा वापर करावा. उदा. गुगलवर “contact us” असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एकत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.
७. आपल्या प्रश्नामध्ये ‘ * ’ चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पूर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधित इतरही शब्द सापडल्यास ती देखील दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ‘ * ’ चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगलवर ‘friend* ’ असे शोधल्यास friend या शब्दासोबत friends, friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचादेखील उत्तरामध्ये विचार करतो.
८. आपल्या प्रश्नामध्ये ‘?’ चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ‘ ?’ चिन्हाचा वापर करावा. उदा. ‘fri??d’ असे सर्च केल्यास गुगल त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती अक्षरे घेऊन त्या माहितीची पानं दाखवितो.