गणेशउत्सवाच्या काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरून अनेक उंच गणेश मुर्त्या बनवल्या जातात. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरून बनवण्यात आलेल्या या मुर्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमींकडून इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक मंडळांनी याला चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाडूच्या मातीच्या किंवा नैसर्गिक पदार्थ वापरून गणेशाची मुर्ती साकारली जाते. महाराष्ट्रात अशी अनेक मंडळी आहेत ज्यांनी भाज्या, फुले किंवा इतर पदार्थ वापरून गणपतीची मुर्ती साकारली आहे. असे फोटोही आपण याआधी पाहिले असतील. हल्लीच मुंबईतल्या एका मंडळाने जिलेबीपासून गणपती बाप्पा साकारला होता.
महाराष्ट्रात अशी अनेक मंडळे आहेत पण आता तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये देखील इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवण्याकडे कल वाढू लागला आहे. चेन्नईमधल्या एका गणेशोत्सव मंडळाने अननस वापरून गणपती बाप्पांची भव्य मुर्ती साकारली आहे. ही मुर्ती २० फूटांपेक्षाही अधिक आहे आणि हा गणपती बाप्पा साकारण्यासाठी या मंडळाने तब्बल ३ टन अननस वापरले आहेत. तसेच बाप्पांचे कान बनवण्यासाठी त्यांनी ऊसाचा देखील वापर केला आहे. चेन्नईच्या कोलातूर भागात या अननासच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी असा गणपती बनवण्यात आल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. या गपणतीचे नयनरम्य रुप पाहण्यासाठी आणि ते कॅमेरात कैद करण्यासाठी भाविकांनी तूफान गर्दी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा