जगातल्या थोरामोठ्यांचं एक बरं असतं. काहीही झालं कुठलीही मोठी घटना घडली की आपलं एक वाक्य फेकायचं. ज्ञान द्यायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी मग सुरळीत पार पडतात. न्यूटनचंच घ्या, शाळा काॅलेजमधल्या पुस्तकांमध्ये त्याने काही म्हटलं की सगळ्या गोष्टी क्लिअर. मग त्याच्याआधी कुठल्याही शास्त्रज्ञांने काहीही म्हटलेलं असो. न्यूटनबाबाने एकदा म्हटलं की मागची थिअरी बाद आणि तो म्हणेल ती खालची दिशा!
पण ही सगळी मोठी माणसंही वाईट पध्दतीने तोंडावर आपटली आहेत. न्यूटनने मांडलेल्या काही थिअरीज् सुध्दा ‘वेडपट’ या सदरात मोडणाऱ्या होत्या. त्या नंतरच्या काळात खोट्या ठरवण्यातही आल्या होत्या.
न्यूटन बिटन जाम बाप माणसं पण गेल्या पन्नास-साठ वर्षातसुध्दा अनेक जगप्रसिध्द आणि जाणत्या माणसांनी किंवा संस्थांनी केलेली काहीस्तं फार म्हणजे फार वाईट पध्दतीने खोटी ठरली होती. या जाणत्या माणसांच्या यादीत आईनस्टाईन, बिल गेट्स यासारख्या जाम मोठ्या माणसांचा समावेश आहे. तर पाहुयात गेली शंभर एक वर्षं या सगळ्यांनी तोडलेले तारे
बिल गेट्स
“आपण ३२ बिट आॅपरेटिंग सिस्टिम कधीही बनवू शकणार नाही”
प्रत्यक्षात ३२ बिट सिस्टिमपेक्षाही अधिक चांगल्या सिस्टिम्स वापरात अनेक वर्षांपूर्वी आलेल्या आहेत.
अल्बर्ट आईनस्टाईन
“अणुऊर्जा मिळवणं शक्य नाही”
प्रत्यक्षात त्यांनी शोधलेल्या सूत्रामुळेच जगातला पहिला अणुबाँब बनवणं शक्य झालं होतं.
नेपोलिअन बोनापार्ट, फ्रेंच सम्राट
“एखाद्या बोटीमध्ये फक्त एखादी आग पेटवून तिला वाऱ्यांची दिशा आणि समुद्राच्या लाटांविरोधात कसं काय नेता येईल?”
युरोपखंड जिंकलेल्या फ्रेंच सम्राटाला वाफेच्या किंवा कोळशाच्या शक्तीवर चालणाऱ्या बोटींची कल्पना हास्यास्पद वाटली होती.
न्यूयाॅर्क टाईम्स (१९३६)
“माणसाने बनवलेलं राॅकेट पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अंतराळात जाऊच शकणार नाही”
आता परवाच भारताने एकाच वेळेस १०४ उपग्रह अंतराळात सोडण्याची किमया साधली
इरॅस्मस विल्सन (आॅक्सफर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर), 1878
“पॅरिसमधलं हे प्रदर्शन संपलं की विजेवर चालणाऱ्या दिव्यांचा खेळसुध्दा संपेल आणि यापुढे या दिव्यांचा जगात काहीही मागमूस राहणार नाही”
याच प्रदर्शनात विजेच्या दिव्यांचा शोध लावणारा संशोधक एडिसन सहभागी झाला होता.
ही आणि यासारखी अनेक उदाहरणं जगभर आहेत. एरव्ही आपल्या ज्ञानाने, पराक्रमाने आणि बुध्दीने जगात नाव कमवणाऱ्या या व्यक्ती किंवा गौरवशाली परंपरा असणाऱ्या न्यूयाॅर्क टाईम्ससारख्या संस्था या काही बाबतीत अगदी खोट्या ठरल्या.
पण हेसुध्दा लक्षात घेतलं पाहिजे की या मोठ्यांचं हे ‘चुकणं’ही लक्षात येतं ते त्यांनी याशिवाय गाजवलेल्या असामान्य कर्तृत्वामुळे. काळाच्या पुढे असणाऱ्या आपल्या दृष्टीचा आधार घेत त्यांनी जगाच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजावली आहे. बाकी ज्ञान झाडणारे व्हाॅट्सअॅप फाॅरवर्ड्स कोणीही पाठवेल. काय?