चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासून संपूर्ण जगभरातील नागरिकांच्या नजरा चीनकडे लागल्या आहेत. चीनमध्ये घडणाऱ्या बारीक सारीक गोष्टींकडे जगभरातील लोक गांभीर्याने पाहत आहेत. चीनमधील व्हायरल झालेले व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी धुमाकूळ घालतात. कारण चीन देशात विचित्र घटना घडत असल्याने अनेकांच्या भुवया नेहमी उंचावतात. असाच चीनमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शेकडोंच्या संख्येत असलेल्या मेंढ्या मागील दहा दिवसांपासून घड्याळाप्रमाणे गोलाकार फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा काय प्रकार आहे, मेंढ्यांना काही आजार झाला आहे का? चमत्कार आहे का? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.
नेमकं काय घडलंय?
शेकडो मेंढ्या एकाच सर्कलमध्ये गोल फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या दहा दिवसांपासून मेढ्यांनी सुरु केलेला हा धक्कादायक प्रकार चीन देशातील आहे. मेंढ्यांच्या या गोलाकार फिरण्यामागे कोणतं रहस्य दडलं आहे, याचा थांगपत्ता लागलेला नाही. अनेकांना याबाबत प्रश्न पडले असून त्यांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. उत्तर चीन प्रांतातील मोंगोलियात शेकडो मेंढ्या दहा दिवसांपासून सर्कल करून फिरत आहेत. या विचित्र प्रकाराबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. थंडीपासून त्या मेंढ्या स्वत:ला सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतील, असं एका युजरने कमेंट करुन म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, ते एलियन्स आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून तज्ज्ञांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाहीय. या मेंढ्यांना लिस्टीरियोसिसचा आजार झाल्यामुळे त्या गोलाकार फिरत आहेत, असं बोललं जात आहे. तसंच सर्कलिंग आजार झाल्यामुळं अनेक प्राणी स्वत:ला गोलाकार करुन फिरण्याचा प्रयत्न करतात, अशीही माहिती समोर आली आहे. पंरतु, यामागे नेमकं काय कारण आहे, याचं अधिकृत उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीय.