Husband buys private island: शौक बडी चीज है, असा एक डायलॉग हिंदी सिनेमात किंवा जाहिरातीमध्ये तुम्ही ऐकला असेल. पण खऱ्या आयुष्यातही लोक या डायलॉगप्रमाणे वागत असतात. गोष्ट दुबईची असेल तर बोलायलाच नको. आखाती देशांमध्ये असलेली श्रीमंती आणि त्यातून आपले छंद पूर्ण करण्यासाठी केलेला आटापिटा सर्वांना परिचित आहेच. पण दुबईतील हे गर्भश्रीमंत लोक फक्त स्वतःच्याच नाही तर पत्नीच्याही इच्छा पूर्ण करतात. दुबईतील एका गृहिणीला बिकनी घालून मोकळेपणे समुद्रकिनारी हिंडता यावे, म्हणून तिच्या नवऱ्यानं चक्क अख्खं बेटच विकत घेतलं आहे. सौदी अल नादक (वय २६) या महिलेनं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर ही बातमी दिली आहे. तसेच खासगी बेटाचाही व्हिडीओ शेअर केला आहे.

मुळची युकेमधील असलेल्या सौदी अल नादकने दुबईतील उद्योगपती जमाल अल नादकबरोबर लग्न केलं. दुबईत एकत्र शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली आणि त्यांनी तीन वर्षांपूर्वी लग्न केलं. सौदी अल नादक ही इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय दिसते. ती स्वतःला एन्फ्लूएन्सर असल्याचे सांगते. सोशल मीडियावर तिच्या उंची जीवनशैलीचे अनेक फोटो, व्हिडीओ तिने पोस्ट केले आहेत. एका पोस्टमध्ये तिने म्हटले की, जमालनं तिच्यासाठी एका दिवसात एक दशलक्ष डॉलरची हिऱ्याची अंगठी घेतली आणि दोन दशलक्ष डॉलरची एक पेंन्टिग विकत घेतली.

हे वाचा >> iPhone: ‘मी भंगार गोळा करतो’, पठ्ठ्यानं झटक्यात घेतले दोन iPhone; म्हणाला, ‘पोराला पण घेऊन दिला’

सौदीने आठवड्याभरापूर्वी खासगी बेटाचा व्हिडीओ पोस्ट केला. ज्याला आतापर्यंत २५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. आम्ही गुंतवणूक म्हणून हे बेट घेतलं आहे. जेणेकरून मला बिकनी परिधान करून बिनधास्त फिरता येईल. मी सुरक्षित राहावी, अशी माझ्या पतीला चिंता होती. म्हणून त्यानं थेट बेटच विकत घेतलं, असं सौदीनं म्हटलं आहे.

४१८ कोटींचं बेट खरेदी केलं

सुरक्षेचा विषय असल्यामुळं सौदीनं हे बेट कुठं आहे, याची कोणतीही माहिती दिलेली नाही. पण हे बेट आशिया खंडात असून त्याची किंमत ५० दशलक्ष डॉलर असल्याचे सांगितलं जातं. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत ४१८ कोटींहून अधिक होते.

सौदीच्या उंची जीवनशैलीच्या दिखाव्यामुळे सोशल मीडियावर तिला टीकेचाही सामना करावा लागतो. आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायची काय गरज आहे? असा सवाल तिला अनेकजण विचारतात. तर सौदीचं म्हणणं आहे की, माझ्या आयुष्याबद्दल माहिती दिली तर त्यात तिरस्कार करण्यासारखं काय आहे.