जगात काही माणसं खूप वेगळी असतात, त्यांच्या दृष्टीने ‘प्रेम’ ‘लग्न’ या संकल्पनाच वेगळ्या असतात. सात जन्म एकमेकांची साथ लाभेल न लाभेल. पण या जन्मात मात्र एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही, भलेही प्रेमात लाख संकटं येऊ दे. पण एकमेकांना एकटं सोडायचं नाही या एका वचनाने ती बांधलेली असतात. म्हणूनच तर अशा लोकांच्या प्रेमकथा वाचताना त्या अनुभवताना आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पालटतो. रे आणि ट्रेसी यांची प्रेमकथा त्यातलीच एक. या दोघांनीही आपल्या प्रेमकथेने प्रत्येकाला काही ना काही शिकवलं असणार हे नक्की. आपल्या होणाऱ्या नवऱ्याजवळ फक्त काही तास उरलेत हे माहिती असूनही ट्रेसी लग्नाला तयार झाली. एकमेकांशी लग्न करायचं, सुखाचा संसार करायचा अशा शपथा घेत काही वर्षांपूर्वी दोघांचे प्रेम फुललं होतं. शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहण्याचे वचन दोघांनी एकमेकांना दिलं, पण नियतीला मात्र दोघांचं एकत्र येणं काही मान्य नव्हतं.

लग्नाच्या काही महिने आधी रेला कॅन्सर असल्याचे समजलं. त्याचा मृत्यू होणार हेही अटळ होतं. पण ट्रेसीला रेची साथ सोडायची नव्हती. रेजवळ फार दिवस उरले नसले तरी त्याच्याशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय तिने घेतला. हे दोघंही जून महिन्यात लग्न करणार होते. पण रेची प्रकृती पाहता तो आठवडाभरही जिवंत राहू शकत नाही, असं डॉक्टरांनी ट्रेसीला सांगितलं. तेव्हा रेची शेवटची इच्छा म्हणून ट्रेसीने आपल्या जवळचे मित्र मैत्रिण आणि नातेवाईकांना बोलावून रेशी रुग्णालयातच लग्न केलं. लग्नानंतर केवळ ४८ तासांतच रेने अखेरचा श्वास घेतला. भलेही या दोघांचं सुखांनं संसार करण्याचं स्वप्न अधुरं राहिलं पण शेवटच्या श्वासापर्यंत रेला साथ देण्याचं वचन मात्र ट्रेसीने पूर्ण केलं.

Story img Loader