PM Narendra Modi In Nikhil Kamath Podcast : झिरोधा या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या ‘People By WTF’ पॉडकास्ट मालिकेतील पुढचे पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. या पॉडकास्टच्या नव्या ट्रेलरमधून याचा खुलासा झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच पॉडकास्टसारख्या माध्यमातून सर्वांसमोर येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी गुरुवारी निखिल कामथ यांनी एक टीझर प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये निखिल कामथ पॉडकास्टवर आलेल्या एका पाहुण्याबरोबर बोलत असल्याचे दाखवले होते. मात्र, त्यामध्ये पाहुणे कोण आहे, हे दाखवले नव्हते. असे असले तरी टीझरमधील आवजावरून हे पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा अंदाज अनेकांनी लावला होता. आता शुक्रवारी सायंकाळी निखिल कामत यांनी पॉडकास्टवरील पुढील पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा खुलासा करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निखिल कामथ यांच्याबरोबरचा पॉडकास्ट केव्हा प्रसिद्ध होणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान कामथ यांच्या पॉडकास्टच्या या भागाचे नाव ‘पीपल विथ द प्राईम मिनिस्टर’ असे आहे.

मी देव नाही…

या पॉडकास्टमध्ये सुरुवातीलाच “मी पहिल्यांदाच पॉडकास्टमध्ये सहभागी होत आहे,” असे पंतप्रधानांनी म्हटल्याचे ऐकू येत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिलेल्या भाषणाचाही उल्लेख केला, “चुका अपरिहार्य आहेत. मीही चुका केल्या असतील. मी एक माणूस आहे, देव नाही”, असे ते म्हणाले.

पॉडकास्टच्या या ट्रेलरमध्ये, पंतप्रधान मोदी जागतिक तणाव आणि सध्या चालू असलेल्या जगातील युद्धांबाबत भारताच्या भूमिकेवर भाष्य करतानाही दिसले. ते म्हणले, “या संकट काळात, आम्ही सातत्याने सांगत आहोत की, आम्ही तटस्थ नाही. मी शांततेच्या बाजूने आहे.”

चांगल्या लोकांनी राजकारणात यावे

या पॉडकास्टच्या ट्रेलरमध्ये पंतप्रधान मोदी यांनी लोकांना राजकारणात येण्याचे आवाहन केल्याचेही दिसत आहे. यावेळी राजकारणात येण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यांनी एक सल्लाही दिला. ते म्हणाले, “लोकांनी महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे. चांगल्या लोकांनी राजकारणात येत राहिले पाहिजे.”

हे ही वाचा : “किती वेळ पत्नीकडे पाहत बसणार…” L&T च्या अध्यक्षांचा कर्मचाऱ्यांना रविवारीही काम करण्याचा सल्ला, सोशल मीडियावर उठली टीकेची राळ

कोण आहेत निखिल कामथ?

निखिल कामथ हे ब्रोकिंग फर्म झेरोधा तसेच टू बीकन या कंपनीचे सह संस्थापक आहेत. याशिवाय ते रिटेल स्टॉक ब्रोकरही आहेत. कर्नाटकातील शिमोगा येथे जन्मलेल्या निखिल कामथ यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंतच झाले आहे. कंपनी सुरू करण्यापूर्वी निखिल कामथ एका कॉल सेंटरमध्ये काम करायचे. पुढे २०१० मध्ये निखिल कामथ यांनी त्यांचे भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत झिरोधा कंपनी सुरू केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am not god pm modi joins nikhil kamath on people by wtf podcast aam