एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पाच सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या, अमेरिकन ऑलिम्पियन जलतरणपटूने हिंदू धर्मग्रथांचं कौतुक केलं आहे. हिंदू धर्मग्रंथांचं वाचन केल्यानंतर मानसिक शांतता मिळते असं वक्तव्य मिसी फ्रँकलिनने केलं आहे. वयाच्या 23 व्या वर्षी प्रँकलिनने खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. मनोरंजन म्हणून योग शिकायला सुरुवात केलेल्या फ्रँकलिनला हिंदू धर्माची माहिती मिळाली. यानंतर तिच्या मनात अध्यात्माविषयी ओढ निर्माण झाली. सध्या ती जॉर्जिया विद्यापीठात धर्माशी संबधित विषयावर अभ्यास करते आहे.
लॉरेस विश्व खेळ पुरस्कारावेळी फ्रँकलिननं तिच्या धर्माशी संबंधित अभ्यासाची माहिती दिली. ”गेल्या वर्षभरापासून माझा अभ्यास सुरू आहे. हिंदू धर्मग्रंथ वाचून मला मानसिक शांतता आणि समाधान मिळालं. त्यामुळे माझे डोळे उघडले. विविध संस्कृती, त्यासंबंधित माणसं, त्यांच्या धार्मिक प्रथा-परंपरा याबद्दल वाचन करायला मला आवडतं,” असं तिनं सांगितलं. ”मी ख्रिश्चन धर्माची आहे. मात्र मला हिंदू आणि इस्लाम धर्म जास्त आवडतात. या दोन्ही धर्मांबद्दल मला फारशी माहिती नाही. त्यामुळेच मला दोन्ही धर्मांबद्दल खूप कुतूहल आहे. या धर्मांबद्दल वाचन केल्यानंतर त्यांच्याविषयीची ओढ आणखी वाढली,” असं लंडन ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदकं पटकावणाऱ्या फ्रँकलिननं सांगितलं.
फ्रँकलिन सध्या रामायण आणि महाभारत हे दोन धर्मग्रंथ वाचत आहे. ”त्या महाग्रंथामधल्या गोष्टी मला अविश्वसनीय वाटतात. त्यातील देवांविषयी जाणून घेणं मला खूप आवडतं. या दोन्ही ग्रंथांचं वाचन करण्याचा अनुभव सुंदर आहे. महाभारतातली सर्व नावं माझ्या लक्षात नाहीत. अनेकदा माझा थोडा गोंधळ उडतो. मात्र रामायणातील राम आणि सीतेबद्दल वाचायला मला प्रचंड आवडतं,” असं फ्रँकलिननं सांगितलं.