बेंगळुरूपासून ६० किमी अंतरावर असलेल्या नंदी हिल्स येथील ३०० फूट खोल दरीत पडलेल्या ट्रेकरला रविवारी भारतीय हवाई दल, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने वाचवले आहे. यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली. बेंगळुरूमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेला दिल्लीचा १९ वर्षीय तरुण दरीत पडला आणि अडकला, असे चिक्कबल्लापुराचे पोलीस अधीक्षक जीके मिथुन कुमार यांनी पीटीआयला सांगितले.
“निशंक ट्रेकिंगसाठी एकटाच आला होता आणि दरीत पडला. घसरल्यानंतर तो सुदैवाने अडकून राहिला. तो जर तिथून घसरला असता तर ३०० फूट खाली खडकात पडला असता. दरीत पडल्यानंतर तरुणाने पोलीस नियंत्रण कक्षाला मेसेज केला आणि त्याचे लोकेशन शेअर केले. लवकरच, एसडीआरएफ आणि एनडीआरएफसह पोलिसांचे पथक बचावासाठी गेले. पण त्यांना निशंकला बाहेर काढता आलं नाही. नंतर त्यांनी आयएएफशी संपर्क साधला आणि त्यांनी बचावासाठी धाव घेतली,” पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हवाई दलाने निवेदनात म्हटले आहे की “चिक्कबल्लापुराच्या उपायुक्तांनी हवाई दल स्टेशन, येलाहंका यांच्याशी संपर्क साधला आणि एक तरुण ट्रेकर घसरून ३०० फूट खाली दरील पडल्याबद्दल सांगितलं. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एक Mi17 हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या शोध आणि मार्गदर्शनानंतर, IAFला तरुणाला शोधण्यात आले. दरम्यान, लँडिंगसाठी हा प्रदेश धोकादायक असल्याने, Mi17 च्या फ्लाइट गनरला ट्रेकरच्या जवळ असलेल्या विंचने खाली उतरवले. फ्लाइट गनरने त्याला मदत केली आणि तरुणाला वर ओढून घेतले.”
ऑनबोर्ड वायुसेना वैद्यकीय सहाय्यकाने वाचलेल्या तरुणाला भेट दिली. त्यानंतर हेलिकॉप्टरने त्याला येलाहंका येथून जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.