Viral News : सध्या अनेक खाद्यपदार्थांवर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. कधी कुणी पाणीपुरी मॅगी बनवतंय, कधी गुलाबजामचं दही तर कधी मँगो ऑम्लेट बनवत आहेत. खाण्यापिण्याच्या आवडीच्या पदार्थांवर केलेले असे विचित्र प्रयोग पाहून लोकांचे ते खाण्यावरून मनही उडून जात आहे. सध्या अशाच प्रकारे अनेकांच्या आवडत्या चहावर एक विचित्र प्रयोग केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो भलताच अतरंगी आहे. पण चहासोबत केलेला हा भलता प्रयोग पाहून चहाप्रेमी मात्र चांगलेच भडकले आहेत.
बहुतांश भारतीयांची दिवसाची सुरुवात ही गरमागरम वाफाळलेल्या चहाने होते. कितीही टेन्शनमध्ये असू दे या वेळी एक कप चहाने डोकं शांत होते. उन्हाळा असो वा पावसाळा गरमागरम चहाशिवाय काही जण राहू शकत नाही. म्हणून भारतात चहाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. कधी वेलची, सुंठ तर कधी इतर मसाले टाकून चहा बनवला जातो. पण एका चहा विक्रेत्याने कमाल केली आहे. या विक्रेत्याने चहाचा काहीसा वेगळा प्रकार तयार केला आहे.
चहा विक्रेत्याने चक्क फ्रूट टी बनवला आहे, ज्यामध्ये त्याने केळी आणि चिकूसारखी फळे टाकली आहेत. यासोबतच त्याने असा दावा केला आहे की, असा चहा आजपर्यंत जगात कोणीही बनवला नाही. कारण आत्तापर्यंत आपण चहामध्ये आलं, तुळस किंवा इतर मसाले टाकताना पाहिलं असेल, पण क्वचितच तुम्ही चहामध्ये एखादं फळ टाकताना पाहिलं असेल.
देशाचे पंतप्रधान कोण? या प्रश्नाचं पतीला उत्तर न देता आल्याने पत्नीने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चहा विकणारी व्यक्ती स्वत:ला ‘आयएएस चायवाला’ म्हणवून घेत आहे. या वेळी त्याने नेहमीप्रमाणे तो दूध, साखर, चहा पावडर, पाणी असे पदार्थ टाकून चहा बनवून घेतला, यानंतर फ्रूट टी बनवण्यासाठी प्रथम केळी सोलून टाकली. यानंतर चिकू टाकला. नंतर तो चहा थोडा वेळ उकळला आणि गाळणीने गाळून कपात ओतून ग्राहकाला दिला. पण ग्राहकाला चहाची ही विचित्र रेसिपी आवडली की नाही हे माहीत नाही, पण व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मात्र नक्कीच नाराज झाले आहेत.
हा व्हिडीओ सध्या seedhadillisevlog1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला सहा हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे तर अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट्सदेखील केल्या आहेत. ‘चहामध्ये फळे मिसळू नका, ते विषारी बनू शकते,’ असे काही जण म्हणत आहेत, तर काही जण म्हणतात की, ‘या कृत्यांमुळेच तर तू आयएएस झाला नाहीस ना.’ पण तुम्हाला चहाचा हा प्रकार आवडला की नाही, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.