जंगलातील प्राणी त्यांच्या गरजेनुसार अन्न, पाणी यांचा शोध घेतात. पण, उन्हाळा ऋतूत पाण्याची टंचाई नेहमीच निर्माण होते. तर यासाठी उन्हाळा ऋतू येण्यापूर्वी आणि प्राण्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध व्हावेत म्हणून तामिळनाडू वन विभागाने एक खास पाऊल उचलले आहे. जंगल परिसरात तलाव बांधून प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम वन विभागाद्वारे करण्यात येत आहे. तर आयएएस अधिकारी यांनी सोशल मीडियावर या उपक्रमाबद्दल माहिती देत एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी एक्स (ट्विटर)वर व्हिडीओ शेअर केला आहे. तामिळनाडूच्या घनदाट जंगलात हत्तीचे एक कुटुंब व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. यामध्ये हत्ती आणि हत्तीच्या पिल्लांचा एक कळप वर्तुळाकार तलावाभोवती जमला आहे. व्हिडीओत ते पाण्याचा आनंद घेताना तर दिसत आहेतच, पण त्याचबरोबर हत्ती आणि त्याची पिल्ले तहान भागवताना आणि आपापसात मजा करताना दिसून येत आहेत. एकदा पाहाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ.
पोस्ट नक्की बघा :
व्हिडीओ दृश्य हृदयस्पर्शी तर आहेच, शिवाय जंगलात हे नव्याने बांधलेले तलाव वन्यजीवांच्या अधिवासात स्वच्छ पाणी हा उपक्रम राबवतो आहे हेसुद्धा अधोरेखित होते आहे. या पाण्याच्या तलावांचे बांधकाम हे वन्यजीव संरक्षण आणि वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक परिसरात स्वच्छ पाणी मिळावे या प्रयत्नांचा एक भाग आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांच्या @supriyasahuias एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तामिळनाडूमधील एका वन्यजीवांसाठी नव्याने बांधलेल्या पाण्याच्या तलावात एक सुंदर हत्ती कुटुंब कैद झालं आहे. वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तामिळनाडू वन विभागाने हा तलाव तयार केला आहे. गेल्या वर्षी १७ तलाव तयार करण्यात आले होते आणि यावर्षी १८ तलाव बांधण्याचे काम तामिळनाडू जैवविविधता संरक्षण आणि ग्रीनिंग प्रोजेक्ट फॉर क्लायमेट चेंज रिस्पॉन्स अंतर्गत सुरू आहे. आयएएस अधिकारी याची पोस्ट पाहून नेटकरी तामिळनाडूतील वन विभागाच्या कामगिरीचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.