ICC Cricket World Cup 2023 Google Doodle: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्याबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आज रविवारी (१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियासमोर पाच वेळी विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलिया टीमचे कडवे आव्हान असेल. त्यामुळे कोणता संघ विश्वचषक २०२३ जिंकण्यात यशस्वी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी गूगलही (Google ) खूप उत्सुक आहे. कारण- गूगलने भारत आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना शुभेच्छा देत World Cup 2023 चे डूडल साकारले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या अंतिम सामन्यासाठी बनवलेल्या या डूडलमध्ये खेळपट्टी दाखवण्यात आली आहे. तसेच बॅट आणि विश्वचषकाचाही वापर केला आहे. हे डूडल पूर्णपणे क्रिकेटचा उत्साह दाखवीत आहे. तुम्ही गुगल डूडल नीट बघितले, तर तुम्हाला दिसेल की, Google मधील दुसऱ्या O च्या जागी वर्ल्ड कप ट्रॉफी दिसत आहे; तर Google मधील L च्या जागी बॅट दिसत आहे.
या डूडलमध्ये तुम्हाला क्रिकेटचे सजलेले स्टेडियम, पिच, फटाक्यांची आतषबाजी, फिरणारी ट्रॉफी व बॅट दिसतेय. महत्त्वाचे म्हणजे हे डूडल GIF फॉरमॅटमध्ये असून, त्यातील अक्षरे बदलत आहेत. या गूगल डूडलवर क्लिक करताच तुम्हाला विश्वचषक २०२३ अंतिम सामन्यासंबंधित प्रत्येक घडामोडीच्या अपडेट्स मिळतील.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना आज दुपारी २ वाजता सुरू होणार असून, संपूर्ण जगाच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय इतरही अनेक जण व्हीआयपी स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत.