IND vs NZ:  भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा दणदणीत पराभव केला. बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील विजयाने भारताने अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. २०१९ मध्ये भारताला अंतिम फेरीतून बाहेर काढणाऱ्या न्यूझीलंड संघाला ७० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाला जात असले तरी विजयाचा खरा हीरो ठरलेल्या मोहम्मद शमीचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. शमीच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला सहज विजय मिळवता आला. त्यामुळे सामना संपण्यापूर्वीच मोहम्मद शमी सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. या ट्रेंडमध्ये सहभागी होण्यापासून दिल्ली आणि मुंबई पोलिसही स्वत:ला रोखू शकले नाहीत. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी या विजयाचा उल्लेख करत एक्सवर (ट्विटर) हटके पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली व मुंबई पोलिसांची व्हायरल पोस्ट

सर्वप्रथम दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना एका पोस्टमध्ये टॅग करीत लिहिले की, ‘मुंबई पोलीस, आम्हाला आशा आहे की आज झालेल्या हल्ल्यासाठी (शमीची भेदक गोलंदाजी) तुम्ही मोहम्मद शमीला अटक करणार नाही’. दिल्ली पोलिसांच्या या पोस्टला उत्तर देत मुंबई पोलिसांनी लिहिलं की, ‘तुम्हीही शमीविरोधात असंख्य लोकांची मने चोरण्याचं (मन जिंकण्याचं) कलम लावायला आणि त्यात इतर काही सहआरोपींची नावं द्यायलाही विसरलात’. यात दिल्ली पोलिसांनी सामन्यात प्रभावी कामगिरी करणारे विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, के. एल. राहुल व जसप्रीत बुमराह यांचा उल्लेख केला नसल्याचं मुंबई पोलिसांना आपल्या पोस्टमध्ये सूचित करायचं आहे.

विशेष म्हणजे दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या या संवादामध्ये मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांनीही मिश्किल पोस्ट करत सहभाग घेतला आहे. दिल्ली पोलिसांच्या सोशल मीडिया पोस्टवर (शमीवर गुन्हा दाखल करण्याबाबत) उत्तर देताना ते म्हणाले, “अजिबात नाही. हे (शमीची कामगिरी) स्वसंरक्षणार्थ सुरक्षा पुरवण्यासाठी पात्र आहे”! काही वेळातच मुंबई पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. मोहम्मद शमीने या सामन्यात सात विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

भारतीय क्रिकेट संघाच्या दणदणीत विजयानंतर एकाने पोस्ट करत लिहिले की, ‘शमीभाईमुळे खऱ्या अर्थाने आज दिल्लीत दिवाळी साजरी झाली’. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘आमच्या शमीभाईंना मनापासून सलाम! आपल्या या हिऱ्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. आता आम्ही शमीभाईंकडेही मागणी करतो की, आम्हाला फायनलमध्ये तुमच्याकडून आणखी पाच विकेट्स हव्या आहेत’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2023 ind vs nz match mumbai and delhi police go witty on mohammed shamis stunning performance sjr