ICC T20 Men’s World Cup Selection: आगामी आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. निर्णायक समितीने फार प्रयोग न करता अगदी सुरक्षित खेळाडूंसह भारताचा संघ निवडला पण यात अनेक अपेक्षित मातब्बर खेळाडूंना मात्र जागा दिली नाही. मोहम्मद शमी, कुलदीप यादव यांसारख्या खेळाडूंना संघात समाविष्ट न केल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यावरून काँग्रेसचे माजी आमदार तर इतके भडकले की त्यांनी जोपर्यंत संघाच्या निवडप्रक्रियेत बदल होत नाही तोपर्यंत आपण सामना बघणारच नाही असा प्रण घेतला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची बांधणी झाली असून १६ ऑक्टोबर पासून टी २० विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या विरुद्ध होणार आहे. विश्वचषकाच्या टीम इंडिया मध्ये मोहम्मद शमी, सिराज, खलील अहमद या खेळाडूंना स्थान न दिल्याने बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज विधानसभेचे माजी आमदार तौसीफ आलम यांनी सवाल केले आहेत.
काँग्रेस नेते तौसीफ आलम यांनी फेसबुक पोस्ट करत म्हंटले की, जोपर्यंत भारतीय संघाची निवड निष्पक्ष होत नाही तोपर्यंत मी क्रिकेटच बघणार नाही. आलम यांच्या पोस्टवर अनेकांनी समर्थन दर्शवले आहे. मोहम्मद शमी व सिराजशिवाय आशिया चषक जिंकता आले नाही आणि आता टी २० विश्वचषकातही भारताला त्यांच्याशिवाय खेळणे कठीण होणार आहे असे काही युजर्सचे म्हणणे आहे, तर काहींनी तुम्हाला बघायची नसेल मॅच तर बघू नका असे म्हणत विरुद्ध पवित्रा स्वीकारला आहे. तर काहींनी आता क्रिकेटमध्येही राजकारण सुरु आहे, चालू द्या! असं म्हणत तटस्थ भूमिका घेतली आहे.
तौसीफ आलम फेसबुक पोस्ट
तौसीफ आलम यांच्या फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट अनेक सोशल मीडिया साईटवर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर ४०० हुन अधिक कमेंट्स व १९०० पेक्षा अधिक लाईक्स आहेत.
दरम्यान, अशा प्रकारे वादग्रस्त पोस्ट करण्याची आलम यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांनी मंगेशकर सुद्धा मुस्लिम झाल्या होत्या असं म्हणत पोस्ट केली होती. ज्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यावर ही पोस्ट हटवण्यात आली होती. तसेच आपण असं काहीही पोस्ट केलं नसल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले होते.