Ind vs NZ 2023: आयसीसी विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या पहिल्या रोमांचकारी सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारतीय संघाने ७० धावांच्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार कामगिरी केली. या दोघांनीही शानदार शतके झळकावली. मात्र, मोहम्मद शमीची ही कामगिरीही भारतीय संघासाठी सर्वात महत्त्वाची ठरली, त्यामुळे सोशल मीडियावर आता मोहम्मद शमी चर्चेचा विषय ठरत आहे. शमीच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळेच भारतीय संघाला विजय मिळवता आला. शमीच्या या उत्कृष्ट खेळीमुळे अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना काल शांत आणि सुखाची झोप लागली. दरम्यान, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यापैकी एक होते, जे शमीच्या कामगिरीमुळे शांत झोपू शकले.
देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत, त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या विजयानंतर आनंद महिंद्रा यांनी शमीसाठी एक कौतुकाची पोस्ट शेअर केली आहे. आनंद महिंद्रा यांनी उत्कृष्ट खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीमुळे बुधवारची उपांत्य फेरी आणखी खास बनली असे म्हणत, त्यांनी मोहम्मद शमीचा उल्लेख ब्लड प्रेशरवरील औषध असा केला आहे.
विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत डॅरिल मिशेलने उत्कृष्ट शतक झळकावल्यानंतर गोष्टी थोड्या विस्कळीत दिसल्या. परंतु, ‘डॉ. शमी’ने सर्व काही नियंत्रणात आणले. ज्या वेळी संपूर्ण देशातील लोकांचा बीपी वाढत होता, त्यावेळी मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करून भारतातील लोकांचा बीपी नियंत्रित करण्याचे काम केले आहे, असे आनंद महिंद्रा म्हणाले.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ज्या वेळी मिशेल मार्बल हिरोसारखे वागत होते, त्यावेळी देशातील लोकांचा बीपी वाढला असेल, पण डॉ. शमीने देशातील लोकांचे बीपी नियंत्रित करण्याचे काम केले आहे, त्यामुळे बीपीवरील औषधाबद्दल डॉक्टर शमी, आभार. आज रात्री आपण शांत झोपू शकतो.
बुधवारी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात धडक मारली. आयसीसी वनडे विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आहे. भारत तब्बल १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या विजयाने देशभरात अजूनही जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियावरही भारतीय संघाबाबत अनेक कौतुकास्पद पोस्ट व्हायरल होत आहेत.