ICC World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना सुरू होण्याआधी देशभक्तीच्या भावना शिगेला पोहोचल्या होत्या. दोन्ही देशांतील खेळाडू आपल्या संघाला विश्वविजेते बनवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आहे; तर लाखो प्रेक्षक आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी हजर आहेत. या ऐतिहासिक क्षणाचा भाग होणे प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. कारण- भारतीय संघ तब्बल १२ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशा स्थितीत भारतीय चाहते भारतीय संघ जिंकावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. दुसरीकडे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाइव्ह मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला.
या स्टेडियमची क्षमता १.३० लाख प्रेक्षकांची आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले आहे. त्यात भारतीय प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा प्रेक्षक पूर्ण उत्साहाने राष्ट्रगीत गाताना दिसले, स्टेडियममध्ये ज्या प्रकारे ‘जन गण मन’चा आवाज घुमत होता. ते दृश्य खरोखरच ऐतिहासिक होते. त्याचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे; जो पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.
सामन्यापूर्वी ५०० फूट लांब तिरंगा फडकवण्यात आला. राष्ट्रध्वज पाहून प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणीत झाला. भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना आधीच खूप खास होता. कारण- भारतीय संघाने सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सर्व संघांचा एकतर्फी पराभव केला. मात्र, जेव्हा १.३० लाख लोकांनी स्टेडियममध्ये एकत्र राष्ट्रगीत गायले, तेव्हा हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक ठरला. कारण- अनेक दिग्गज लोकही स्टेडियममध्ये उपस्थित होते. स्टेडियममध्ये उपस्थित असलेला कोणताही भारतीय हा क्षण आयुष्यात विसरू शकणार नाही.