IND VS NZ World Cup 2023 : भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाचे सर्व गडी बाद करत ७० धावांच्या फरकाने सलग १० वा विजय मिळवला. या विजयासह भारताने तब्बल १२ वर्षांनंतर विश्वचषकासाठीच्या अंतिम फेरीत पुनरागमन केले आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने भारताला शानदार सुरुवात करून दिली. त्याने पहिल्याच षटकात चौकार व षटकारांची फटकेबाजी केली. रोहितने शुभमन गिलच्या साथीने एकूण ७१ धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या विजयामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही लोक सेलिब्रेशन करताना दिसले. पण या उत्साही वातावरणात सोशल मीडियावर वडापाव तुफान ट्रेंड होताना दिसला. त्यामुळे विश्वचषक आणि वडापावचा नेमका काय संबंध आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
भारत-न्यूझीलंड सामन्यात वडापाव ट्रेंड
त्याचे झाले असे की, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा खेळत होता तेव्हा कॉमेंट्री करणाऱ्या हर्षा भोगले यांनी असे काही एक विधान केले की, ज्यानंतर सोशल मीडियावर वडापावचा ट्रेंड पाहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘माझा वडापाव कुणीतरी सांभाळा’
क्रिकेटच्या मैदानात न्यूझीलंडविरोधात रोहित शर्मा चौकार व षटकारांसह आक्रमक फलंदाजी करीत होता. त्यावेळी कॉमेंट्री करणारे हर्षा भोगले म्हणाले, “कोणीतरी माझा वडापाव सांभाळा.” पण ते असे का बोलले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, रोहित शर्माच्या चाहत्यांना त्यांचे हे वक्तव्य अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे रोहित शर्माचे चाहते आता सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत आहेत.
हर्षा भोगलेंच्या कॉमेंट्रीवर मीम्सचा पाऊस
कोणीतरी माझा वडापाव सांभाळा, या हर्षा भोगले यांच्या कॉमेंट्रीदरम्यानच्या वक्तव्यावर सध्या मीम्सचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्याबरोबर आता हर्षा भोगले यांच्या वक्तव्याचीही तितकीच चर्चा रंगताना दिसतेय.
हर्षा भोगले भारतीय क्रिकेट कॉमेंटेटर व पत्रकार आहेत. ते क्रिकेट या खेळातील प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. भोगले सध्या वर्ल्ड कपमधील इंग्लिश कॉमेंट्री पॅनेलचा एक भाग आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यातही ते कॉमेंट्री करताना दिसले.