Babar Azam- Ravi Shastri Biryani Video: ICC विश्वचषक 2023 साठी पाकिस्तानी संघ भारतात आल्यापासून त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. भारतीय आदरातिथ्याने भारावून गेलेल्या पाकिस्तानी संघाने सुद्धा अनेकदा भारतीयांचे आभार मानले आहेत. हैदराबादमध्ये मुक्कामाला असताना बाबर आझमच्या ‘मेन इन ग्रीन’ची खाण्यापिण्याची सुद्धा चांगलीच चंगळ सुरु होती. आज आयसीसी विश्वचषकाची सुरुवात होण्याआधी काल आयसीसी तर्फे कॅप्टन्स डे निमित्त एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रवी शास्त्री यांनी बाबर आझमला बिर्याणीवरून पुन्हा प्रश्न केला होता. ज्यावर हसतच बाबर आझमने दिलेले सडेतोड उत्तर सध्या चर्चेत आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करताना पाकिस्तानी संघाचे डाएट व फिटनेस रुटीन भारतात आल्यामुळे काहीसे बदलले आहे. प्रोटीनच्या स्रोतांसाठी पाकिस्तानी संघ हा मुख्यतः चिकन, मटण, मासे यावर अवलंबून आहे. त्यातही बिर्याणीविषयी पाकिस्तानी संघातील अनेक खेळाडूंनी अनेकदा भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी उपकर्णधार शादाब खानने सुद्धा खाऊन आमचं वजन वाढू शकतं अशी चिंता व्यक्त केली होती तर. सराव सामन्याच्या वेळीही बिर्याणीमुळेच फिल्डिंग बिघडली असं शादाब खानने सांगितलं होतं. अशावेळी रवी शास्त्री यांनी पुन्हा बाबर आझमला बिर्याणीवरून प्रश्न करत थोडं चिडवण्याचा प्रयत्न केला. यावर शेवटी बाबर म्हणाला, “१०० वेळा तेच सांगून झालंय, खूप छान होती..”
हैदराबादी बिर्याणीला बाबरकडून १० पैकी किती गुण?
आयसीसीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बाबरने हैद्राबादी बिर्याणीवर आपले मत प्रांजळपणे दिले होते. तो म्हणाला, “हैदराबादी बिर्याणीची जगात एक ओळख आहे. ती काहीशी कराचीच्या बिर्याणीसारखीच आहे पण मी या बिर्याणीला १० पैकी ८ गुण देईन कारण, इथे बिर्याणी थोडी जास्त तिखट आहे.”
दरम्यान, बाबर आझम हा २०२३ च्या विश्वचषकासाठी पहिल्यांदाच भारतात येत आहे. यापूर्वी पाकिस्तानी संघ २-१६ मध्ये आयसीसी स्पर्धेसाठी भारतात आला होता पण तेव्हा दुखापतीमुळे बाबर संघातून बाहेर होता.
हे ही वाचा<< पाकिस्तानी संघाची भारतात चंगळ! पण शादाब खानने व्यक्त केली चिंता, म्हणाला, “आमचे फॅट्स वाढून..”
विश्वचषकपूर्व पत्रकार परिषदेत बोलताना बाबरने सांगितले की, “पाकिस्तानी खेळाडूंना भारतात मिळालेल्या स्वागताची मला अपेक्षा नव्हती. लोक ज्या प्रकारे आमच्या टीमला प्रतिसाद देत आहेत, सगळ्यांना त्याचा आनंद झाला. आम्ही हैदराबादमध्ये एक आठवडा होतो त्यामुळे आम्ही भारतात आहोत असं वाटत नाही, इथे सगळं आमच्यासारखंच आहे. आम्ही घरी आहोत असंच वाटतंय. मला वाटतं की प्रत्येकासाठी १०० टक्के देण्याची आणि स्पर्धेचा आनंद घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. “