द ग्रेट इंडियन टेस्ट हे स्लोगन ७० आणि ८० च्या दशकात देशातल्या प्रत्येक माणसाच्या तोंडी होतं. कारण हे स्लोगन जोडलं गेलं होतं ते देशातला नावजलेला कोला ब्रांड कॅम्पा कोलाही संबंधित होतं. बर्थ डे पार्टी असो किंवा लग्न, राजकीय सभा असो किंवा मित्रांची एकत्रित भेट कँपा कोला शिवाय ते सगळं अधुरं होतं. मात्र ९० च्या दशकात या लोकप्रिय ब्रांडला उतरती कळा लागली. मात्र तीच ग्रेट इंडियन टेस्ट म्हणजेच कँपा कोला नव्या ढंगात नव्या रूपात परत येतं आहे. रिलायन्सने म्हणजेच मुकेश अंबानी यांनी कँपा कोला बाजारात परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रांडची थेट स्पर्धा पेप्सी, कोका कोला, स्प्राईट या लोकप्रिय ब्रांडसोबत होणार आहे. आपण जाणून घेऊ या लोकप्रिय ब्रांडच्या उदय आणि अस्ताची गोष्ट आहे तरी काय?
मुकेश अंबानी आणत आहेत कँपा कोला
भारतातले अरबपती अशी ओळख असलेले रिलायन्स इंडिस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ऐन उन्हाळ्यात लोकांची तहान कँपा कोला या देशी बनावाटीच्या कोल्ड ड्रींकने भागवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोला मार्केटमध्ये आत्तापर्यंत पेप्सी, कोका कोला आणि स्प्राईटसारखे ब्रांड घट्ट पाय रोवून उभे आहेत. मात्र आता या सगळ्या ब्रांड्सना टक्कर द्यायला येतोय कँपा कोला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात २२ कोटींच्या डीलसह मुकेश अंबानी यांनी कँपा कोला आणण्याचं ठरवलं. याचे तीन फ्लेवरही लाँच करण्यात आले आहेत. कोला, लेमन आणि ऑरेंज अशा तीन फ्लेवर मध्ये कँपा कोला मिळणार आहे.
कँपा कोलाचा ५० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे तरी काय?
भारतात कँपा कोलाची सुरूवात झाली ती ५० वर्षांपूर्वी. देशात त्यावेळी कोका कोला या नावाचा दबदबा होता. १९४९ मध्ये कोका कोला भारतात आलं. १९७० पर्यंत कोका कोला लोकप्रियही झालं. त्यांनी मार्केट काबीज केलं होतं. कोका कोलाचा भारतीय व्यवसाय हा मुंबईतला प्योर ड्रिंक ग्रुप सांभाळत होता. १९४९ ते १९७० या कालावधीत कोका कोलाची खूप चलती भारतात होती.
१९४९ ते १९७७ या संपूर्ण वर्षांमध्ये कोका-कोला हा लोकांच्या मनातला कोल्ड ड्रींक ब्रांड होता. १९७७ ला आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक झाली. त्यावेळी जनता पार्टीचं सरकार आलं. त्या कालावधीत भारताचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री होते जॉर्ज फर्नांडिस. जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे उद्योग मंत्रालयही देण्यात आलं होतं. हीच सुरूवात ठरली कोका कोलाला टक्कर देणाऱ्या कँपा कोलाची. जॉर्ज फर्नांडिस जेव्हा देशाचे उद्योग मंत्री झाले तेव्हा त्यांनी भारतात असलेल्या सगळ्या विदेशी कंपन्यांना एक नोटीस पाठवली.त्यामुळे त्यांनी १९७३ च्या FERA चं पालन करा असे आदेश दिले गेले होते. सरकारचा हा आदेश सगळ्या कंपन्यांनी मानला. पण कोका कोलाने तो मान्य केला नाही. आपल्या उत्पादनाची सिक्रेट रेसिपी म्हणजेच त्याचे तपशील सादर करण्याऐवजी या कंपनीने आपला गाशा गुंडाळला आणि ते भारतातून निघून गेले. कोका कोलाला टक्कर देणारा ब्रांड भारतात येणं आवश्यक होतं आणि ती जागा भरून काढली कँपा कोलाने.
कँपा कोलाने कोका कोलाची जागा कशी घेतली?
कोका कोलाने भारतातून काढता पाय घेतल्यानंतर या कंपनीच्या डिस्ट्रीब्युशनचं काम सांभाळणाऱ्या प्योर ड्रिंक ग्रुपने संधीचा फायदा उचलून कँपा कोला हे कोल्ड ड्रिंक बाजारात आणलं. कोका कोलाची जागा लागलीच कँपा कोलाने घेतली. कँपा कोला हे अल्पावधीतच लोकप्रिय झालं आणि घराघरांमध्ये पोहचलं. अबालवृद्धांच्या तोंडी हे नाव फिट झालं आणि ते होतं कँपा कोला. भारतातल्या टॉप मार्केटमध्ये कँपा कोला पोहचलं.
द ग्रेट इंडियन टेस्ट हे कँपा कोलाचं स्लोगन
द ग्रेट इंडियन टेस्ट असं स्लोगन असलेल्या कँपा कोलाने जाहिरातीही आकर्षक आणि लोकांना आपलंसं करतील अशाच केल्या होत्या. या कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीत सलमान खानला पहिला ब्रेक मिळाला. एवढंच नाही तर आयेशा दत्त, आरती गुप्ता, शिराज मर्चंट, सुनील निश्चल हेदेखील या कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीत झळकले. द ग्रेट इंडियन टेस्ट ही त्यांची कॅचलाइन प्रत्येकाच्या तोंडी येऊ लागली आणि हां हां म्हणता हे कोल्ड ड्रिंक प्रसिद्ध झालं.
१९९० मध्ये कँपा कोलाचं मार्केट डाऊन
कँपा कोलाचा व्यवसाय तेजीने वाढत होता. १९९० च्या दशकात भारत सरकारने उदारीकरणाचे नियम सादर केले गेले. त्यानंतर या ब्रांडचे अच्छे दिन संपले. ९० च्या दशकाच्या शेवटी त्यावेळी अर्थमंत्री असलेल्या मनमोहन सिंह यांनी आर्थिक धोरण बदललं त्यामुळे विदेशी ब्रांड्सना भारतात एंट्री मिळण्याची दारं उघडी झाली. ही संधी पाहून कोका कोलाने पुन्हा एकदा भारतीय बाजारात प्रवेश केला. ही कँपा कोलाच्या अस्ताची सुरूवात ठरली.
ज्या कोका कोलामुळे कँपा कोलाचा अस्त झाला ते कोका कोला भारतीय बाजारपेठेत अजूनही पाय रोवून उभं आहे. तरीही कँपा कोला या कोका कोलाला थेट टक्कर देण्यासाठी सज्ज झालं आहे. कोका कोला जेव्हा ९० च्या दशकात भारतात आलं त्यानंतर कँपा कोला हळूहळू मावळत गेलं मात्र त्याच कँपा कोलाची आता मुकेश अंबांनींमुळे घरवापसी होते आहे. हा देशी ब्रांड कोका कोलाला टक्कर देऊन सरस ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.