Man Shares Terrible Rapido Experience: ट्रॅफिकची समस्या बहुधा भारतातील कोणत्याही राज्यात राहणाऱ्या व्यक्तीसाठी नवी नाही. गाड्यांची वाढती संख्या आणि रस्त्यांची कमी रुंदी यामुळे अनेकदा तासनतास गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकून असतात. ही समस्या सहसा दाटीवाटीच्या शहरी भागांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते. मुंबई पाठोपाठ सर्वाधिक गर्दीचे शहर अशी ओळख असणाऱ्या बंगळुरूमधील ट्रॅफिकच्या त्रासाशी आपणही परिचित असाल, अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतला नसेल तरी मीम्स व रील्समधून अंदाज असेलच. या गर्दीत अडकलेल्या जीवांना रॅपिडो सारख्या कंपनीमुळे बरीच सुविधा मिळाली होती. मोठमोठ्या कारच्या गर्दीतून बाईक व रिक्षातुन मात्र सहज ट्रॅफिकला डच्चू देता येतो म्हणूनच हा पर्याय प्रसिद्ध झाला. पण सध्या व्हायरल होणाऱ्या ट्वीटमुळे रॅपीडोवर सुद्धा किती अवलंबून राहता येईल हा प्रश्नच आहे.
अलीकडेच एका ट्विटर युजरने शेअर केले की, त्याने कोरमंगला ते जेपी नगर या ४५ मिनिटांच्या प्रवासासाठी रॅपिडो अॅपवर ऑटोरिक्षा बुक करायची होती, पण या अवघ्या ४५ मिनिटांच्या प्रवासासाठी त्याला तब्ब्ल २२५ मिनिटे (३.७ तास) वाट पाहावी लागणार होती. इतक्या लांब असतानाही त्या रिक्षावाल्याने राईड स्वीकारली हे सुद्धा आश्चर्यच आहे.
दरम्यान, यानंतर रॅपिडो केअर्सने या ट्विटला प्रत्युत्तर देत सांगितले की “त्या वेळी आमच्याकडे रायडर्स उपलब्ध नव्हते. मात्र येत्या काळात ते त्यांच्याकडे उपलब्ध वाहनांचा ताफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.” असे म्हणत रॅपीडोने संबंधित तक्रारदाराची माफी सुद्धा मागितली आहे.
हे ही वाचा<< “आमच्याकडे भीक मागायला येता आणि…” रिक्षावाल्याने रिक्षावर लावलेली पाटी वाचून प्रवासी भडकले
दरम्यान अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी मे महिन्यात, एका व्यक्तीने उबर वापरून ऑटो बुक करताना बराच वेळ प्रतीक्षा केल्याबद्दल तक्रार केली. ऑटोरिक्षा बुक केल्यानंतर अनुशांक जैन यांनी ट्विटरवर त्याच्या उबर अॅपचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यात त्यांनी दाखवले की ज्या वाहनाने त्याची राइड स्वीकारली ते वाहन तब्ब्ल २४ किलोमीटर दूर होते आणि प्रतीक्षा कालावधी तब्बल ७१ मिनिटांचा दाखवत होता. हा प्रकार पाहून अनेकांनी कमेंट करत हे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे आहे. म्हणजे तुम्ही चार आण्याची कोंबडी घेता आणि बारा आण्याचा मसाला अशी स्थिती झाली असा सूर कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे.