वाचनाची आवड अनेकांना असते. आता रोज नवनवीन पुस्तके विकत घेऊन वाचायला कोणाला परवडणार त्यामुळे अनेक जण एखाद्या ग्रंथालयात आपल्या नावाची नोंदणी करुन त्याचे सदस्यत्व स्वीकारतात. अगदी परवडणा-या दरात वेगवेगळ्या विषयांतील, वेगवेगळ्या भाषेतील पुस्तक ग्रंथालयात वाचकाला वाचायला मिळतात. मोजके पैसे मोजून वाचण्याचा आनंद घेता येतो.
पण ग्रंथालयातून पुस्तके वाचायला नेताना ग्रंथपालाकडून ठराविक दिवसांची मुदत दिली जाते. ही मुदत न पाळणा-यास मात्र दंड केला जातो. हा दंड फारफार तर दहा वीस रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत असतो. तसेच जर वाचकाकडून ग्रंथालयाचे एखादे पुस्तक हरवले तर त्याला त्या पुस्तकाची किंमत ग्रंथालयाला द्यावी लागते. काही ग्रंथालयाचे नियम इतके कडक असतात कि पुस्तक हरवणा-यांची सदस्यत्वता देखील रद्द केली जाते. पण आपल्या दृष्टीने बघायला गेले तर या शिक्षा काही मोठ्या नाहीत.
पण अमेरिकेतल्या अथेन्स लाईमस्टोन सार्वजिनक ग्रंथालयाच्या वाचकांना मात्र पुस्तक वेळेत न परत करण्याची किंवा हरवण्याची शिक्षा म्हणून कारावास होऊ शकतो. या ग्रंथालयातील अनेक वाचकांनी पुस्तके वाचायला घेतली मात्र ती वेळेत परत केली नाहीत. तर काहींनी ती परस्पर आपल्या मित्रमैत्रिणींना देऊन टाकली. वाचकांच्या या सवयीमुळे ग्रंथालयाचे हजारो डॉलरचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी ग्रंथालयाने हा रामबाण उपाय शोधून काढला आहे. पुस्तकाची मुदत संपल्यानंतर वाचकांना आठवण करून देण्यासाठी ग्रंथालयाकडून मेल किंवा मेसेज पाठवला जातो. याला उत्तर न दिल्यास १० दिवसांची अतिरिक्त मुदत वाचकाला पत्राद्वारे दिली जाते. पण तरीही वाचकाने पुस्तक परत न केल्यास मात्र त्याला १०० डॉलरचा दंड आणि एक महिन्यांसाठी तुरुंगवासही होऊ शकतो. विशेष म्हणजे पुस्तक परत न केल्यामुळे याआधी अनेक वाचकांना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती येथल्या पोलिसांनी दिली आहे. या ग्रंथालयात अशी अनेक पुस्तके आहेत जी दुर्मिळ आणि अत्यंत महाग आहेत, त्यामुळे अशी कठोर भुमिका घेतल्याचे अथेन्स लाईमस्टोन सार्वजिनक ग्रंथालयाच्या ग्रंथपालाने सांगितले.

Story img Loader