आएफएस अधिकारी प्रवीण कासवान वाईल्डलाईफ फॅक्ट्सबाबत नेहमीच नवनवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. नद्या कशाप्रकारे तयार होतात? याचा एक सुंदर व्हिडीओ त्यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह कशाप्रकारे तयार होतो आणि सर्व बाजूला ते पाणी कसं पसरतं, हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. पहाटे सहा वाजताच्या सुमारास सहकाऱ्यांसोबत जंगल सफारी करताना नदीच्या पाण्याचं दृष्य कासवान यांनी कॅमेरात कैद केलं आहे.
ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, अशा प्रकारे नद्या तयार होतात. जंगल नद्यांची आई आहे. सहकाऱ्यांसोबत सकाळी ६ वाजता जंगल सफारी करताना. इंटरनेटवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर जवळपास ९ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. निसर्ग सौंदर्य दर्शवणारा जबरदस्त व्हिडीओ शेअर केल्याबद्दल नेटकऱ्यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
या व्हिडीओला एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, डोंगर कड्यांच्या कुशीत लपलेलं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी एक दिवस तुमच्यासोबत जंगलात फिरायला नक्की आवडेल. तुम्ही नशीबवान आहात की, तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना जंगलातील सौंदर्य कैद करण्याची संधी मिळाली. पृथ्वीवरील हे सुंदर दृष्य शेअर केल्याबद्ल तुमच्या सर्व टीमचे आभार.
तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, निसर्गाचं असं सुंदर दृष्य पाहायला मिळणं याला भाग्यच लागतं. पक्षी, जंगल, निसर्ग सोंदर्य पाहायला मिळालं, म्हणजे तुम्ही नशीबवान आहात.तसंच अन्य एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “सातपुडा जंगलात नदीच्या परिसरात माझं बालपण गेलं. नदीत पाण्याचा प्रवाह जेव्हा सुरु व्हायचा तेव्हा स्थानिक लोक आम्हाला तिथे जाण्यास मज्जाव करायचे. काही वेळेला पाण्याचा थेंबही डोक्यावर पडलेला नसताना अचानक मोठा प्रवाह नदीच्या दिशेनं यायचा.”