एखाद्या व्यक्तीने गरजेच्या वेळी आपली मदत केली तर त्या व्यक्तीचे आपण आयुष्यभरासाठी ऋणी होतो. त्या व्यक्तीला आणि त्यांनी केलेल्या मदतीला आपण कधीच विसरत नाही आणि कधीही विसरु नये अशीच अपेक्षा असते. याप्रमाणेच आपण एखाद्याला मदत केली तर त्या व्यक्तीनेही त्याची जाण ठेवावी असे आपल्याला वाटते. प्राण्यांच्या बाबतीतही काहीसे असेच असते. त्यांच्यामध्येही कृतज्ञतेची भावना असते हे सध्या व्हायरल होणाऱ्या एका फोटोमधून स्पष्ट होत आहे.
व्हायरल होणारा हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक माणूस आणि हत्ती दिसत आहेत. हत्ती सोंड पुढे करून माणसाचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दोन मित्र भेटल्यानंतर ज्याप्रमाणे हात मिळवतात तसेच हे दोघं करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. ट्वीटच्या कॅप्शनमधून सुशांत नंदा यांनी या अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगितली आहे. या फोटोत दिसणाऱ्या हत्तीने त्या माणसाला ओळखले असुन तो कृतज्ञता व्यक्त करत आहे. कारण १२ वर्षांपुर्वी या फोटोत दिसणाऱ्या पशुवैद्याने या हत्तीचा जीव वाचवला होता.
आणखी वाचा: काळ आला होता पण…; व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले ‘यासाठी कृतज्ञता…’
सुशांत नंदा यांचे ट्वीट:
१२ वर्षांनंतरही या हत्तीने पशुवैद्याला ओळखले आणि कृतज्ञता व्यक्त केली. हत्तींची स्मरणशक्ती सर्वात चांगली असते, असे सुशांत नंदा यांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे. या अनोख्या मैत्रीने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून सध्या हा फोटो व्हायरल होत आहे.