इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे; जिथे एका वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी दोन कबड्डीपटूंमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून युजर्सही हैराण झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या कार्यक्रमात दोन संघांतील खेळाडूंमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर हा वाद इतका वाढला की, दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये हाणामारी झाली.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चुकीच्या पद्धतीने खेळल्यामुळे या दोन कबड्डी संघांच्या खेळाडूंमध्ये मारामारी झाली. यावेळी दोन्ही संघांतील खेळाडू काही मुद्यांवरून एकमेकांबरोबर भांडताना दिसले. यावेळी त्यांच्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव सुरू झाला. अनेक खेळाडूंनी कार्यक्रमासाठी ठेवलेल्या खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेमुळे एक प्रकारे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेली सर्व मुले घाबरून कार्यक्रमातून पळून गेली.
कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही कबड्डी संघांतील खेळाडूंनी अचानक एकमेकांना लाथ मारण्यास सुरुवात केली. त्यानेही त्यांचे समाधान झाले नाही. मग त्यांनी तिथे असलेल्या खुर्च्यांचा शस्त्रासारखा वापर केला. तुम्ही खेळाडू एकमेकांना खुर्च्यांनी मारत असल्याचे पाहू शकता. या घटनेनंतर संपूर्ण कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या खेळाडूंनी विरोधी संघातील खेळाडूंना मिळेल त्या वस्तूने मारण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमात अनेक मुलीही उपस्थित होत्या; ज्या घडल्या प्रकारामुळे कार्यक्रमातून घाबरून पळताना दिसत आहेत.
दोन्ही संघ ठरले अपात्र
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या NSUT (नेताजी सुभाष युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी) आणि YMCA (J. C. Bose University of Science and Technology)च्या मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या घटनेनंतर दोन्ही संघ स्पर्धेतून अपात्र ठरले. अद्याप या घटनेबाबत आयआयटी कानपूरकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.