अंग झाकेल एवढे जेमतेम कपडे, वाढलेली दाढी आणि केस असा विस्कटलेला अवतार घेऊन सायकलवरून गावभर फिरणाऱ्या या इसमाकडे पाहिलं तर कोणालाही ते परिस्थितीपुढे हतबल असलेल्या एका सामान्य, गरिब कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे भासतील. पण दिसण्यापेक्षा त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर त्यांचं कार्य किती मोठं आहे हे लक्षात येईल.
त्यांचं नाव आहे आलोक सागर. दिल्ली विद्यापीठात ते आयआयटीचे प्राध्यापक होते. १९८२ मध्ये त्यांनी आपल्या प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला. सध्या ते मध्य प्रदेशमधल्या बैतुल जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात राहतात. या आदिवासी पाड्यात गेल्या २६ वर्षांपासून ना वीज आहे, ना पक्के रस्ते तरीही शहरांच्या झगमगाटापासून दूर ते राहतात. टेक्सासमधल्या प्रतिष्ठित विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांना प्राध्यापक व्हायचं होतं, त्यामुळे पीएचडी पूर्ण झाल्यानंतर ते भारतात आले. दिल्ली आयआयटीमध्ये प्राध्यापक म्हणून ते शिकवू लागले. पण यापेक्षाही आपण गरिबांच्या विकासासाठी प्रयत्न करावे ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना, त्यामुळे नोकरीला रामराम ठोकून त्यांनी आदिवासी पाड्याचा रस्ता धरला.
अवतीभोवती अनेक कलाकारांची मांदियाळी; ‘हा’ मुलगा आहे तरी कोण?
पाड्यातील लोकांचं आयुष्य सुधारावं, त्यांनी प्रगती करावी यासाठी ते धडपडत आहेत. इतकंच नाही तर त्यांनी पाड्यातील आदिवासींमध्ये वनसंपदेविषयी जनजागृती देखील केली. बैतुल जिल्ह्यात त्यांनी आतापर्यंत ५० हजारांहून अधिक झाडं लावली आहेत. झाडांची काळजी कशी घ्यावी, रोप कशी लावावी अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ते आदिवासींना शिकवतात. उच्च शिक्षण घेऊन भरघोस पगाराची नोकरी करणारे अनेक आहेत पण समाजसेवेसाठी सारं सोडून स्वत:ला झोकून देणारे आलोक सागर यांच्यासारखे फार मोजके लोक या जगात आहेत. गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती, पण हा पुरस्कार मी स्वीकारणार नाही असं त्यांनी एक हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.