काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे आपल्या इंग्रजीसाठी देशभर प्रसिद्ध आहेत. त्यानंतर आता ते त्यांच्या गायनासाठीही प्रसिद्ध होत असल्याचे दिसत आहेत. श्रीनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान शशी थरूर यांनी एक गाणे गायले. त्यानंतर आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ते एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई…’ हे गाणे गाताना दिसत आहेत. शशी थरूर यांचा हा व्हिडिओ अडीच मिनिटांचा आहे. थरूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की “दूरदर्शन श्रीनगर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानंतर लोकांनी मला गाणे गाण्यासाठी प्रवृत्त केले. मी तयारी न करता गायले, पण तुम्हाला मजा येईल!”.

शशी थरूर, माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीच्या सदस्यांसह शनिवारी जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात सामील झाले. थरूर यांनी याच कार्यक्रमात एक गाणे गायले.

शशी थरुर यांच्या या गाण्याला गीतकार जावेद अख्तर यांनीही दाद दिली आहे. “व्वा! आपल्याकडे हिंदीतही जवळपास एकसारखे गाणे आहे !!!” असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

थरूर यांनी शनिवारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांचीही भेट घेतली. यानंतर फारुख अब्दुल्ला यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटोही पोस्ट केला होता. “शशी थरूर तुम्हाला पाहून आनंद झाला. मी लवकरच दिल्लीत माझी चर्चा सुरू ठेवण्यास उत्सुक आहे,” असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई… हे गाणे १९७४ मधील अजनबी चित्रपटातील आहे. हे गाणे किशोर कुमार यांनी गायले होते. आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते आणि आनंद बक्षी यांनी लिहिले होते. हे गाणे राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.