सय्यद इश्क ६० वर्षांचे गृहस्थ. परिस्थितीमुळे त्यांना शिकता आले नाही. सफाई कामगार म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून ते काम करत आहेत, यातून पोटापाण्यासाठी का होईना त्यांना पैसे मिळतात. पण त्यांची अशाप्रकारे ओळख करून देणे चुकीचे ठरेल. सय्यद स्वत: शिकले नाही पण आपल्या झोपडीत ते गेल्या कित्येक वर्षांपासून एक छोटेसे ग्रंथालय चालवत आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ हा आयुष्याचा मंत्र सय्यद यांना कळला. म्हणूनच आपल्या तुटपुंज्या मेहनतीच्या कमाईतून जे काही पैसे मिळतील ते पुस्तक आणि आपल्या ग्रंथालयासाठी खर्च करतात.
वाचा : ‘दंगल’पासून प्रेरणा घेत गावकऱ्यांनी घराबाहेर लावली मुलींच्या नावाची पाटी
शिक्षण हे खूप महत्त्वाचे. एकवेळ चंचल लक्ष्मी कधी पाठ फिरवेल सांगता येत नाही. पण सरस्वती मात्र कधीच साथ सोडत नाही हे सय्यद यांना अनुभवातून समजले. परिस्थितीमुळे सय्यद यांना कधीच शिकता आले नाही, पण शिक्षणाविषयीची त्यांची आस्था कधीच कमी झाली नाही. आपल्या मुलांना त्यांनी शिकवले. आपल्या आजूबाजूच्या मुलांनाही शिक्षणाचे महत्त्व समजावे आणि त्यांनी देखील वेगवेगळ्या भाषेतले ज्ञान संपादन करावे यासाठी सय्यद यांनी आपल्या घरात छोटे ग्रंथालय सुरू केले. या ग्रंथालयात त्यांनी ७ वृत्तपत्रे आणि कन्नड भाषेतील काही पुस्तके ठेवली. आपल्या छोट्याश्या झोपडीत त्यांनी हे ग्रंथालय सुरु केले.
वाचा : जाणून घ्या कांद्याच्या चकत्या घराच्या कोप-यात ठेवण्याचे फायदे
बंगलोर मिरर वृत्तानुसार १० हजार झोपड्यांच्या परिसरात त्यांनी उभारलेले हे एकमेव ग्रंथालय आहे. सय्यद कधी सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. ज्यावेळी काम नसते तेव्हा बांधकाम करून ते आपले पोट भरतात. जे काही पैसे येतात त्यातून ते पुस्तक खरेदी करतात. मैसूर येथील राजीव नगरच्या मशिदीशेजारी त्यांनी आपले हे ग्रंथालय थाटले आहे.