स्थानिक भाषांमधून शिकलेल्या अनेक मुलांना इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड असतो. पण या न्यूनगंडाला किती महत्त्व द्यायचे हे सर्वस्वी त्यांच्यावर आहे. स्थानिक भाषांमध्ये शिकलो नाही म्हणून आपल्याला अस्खलित इंग्रजी बोलता येत नाही हा न्यूनगंड कायम त्यांना छळत असतो .जर तुम्हालाही हा न्यूनगंड असेल तर राजस्थानमधल्या झुंझुनूं जिल्ह्यातील तरुणांकडून नक्कीच शिकले पाहिजे. अनेक आर्थिक कारणांमुळे किंवा शिकण्याची इच्छा नसल्याने या गावातील अनेक तरुण अशिक्षित आहे. पण तरीही या गावातले अनेक युवक हे अस्खलित इंग्रजी आणि इतर विदेशी भाषा बोलतात.
व्हॅलेंटाईन्स डे व्हिडिओ: इंग्लिश येत नाही? हा फंडा वापरा
राजस्थान हे पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. येथले किल्ले, महाल, राजवाडे पाहण्यासाठी फक्त भारतातूनच नाही तर विदेशांतून लोक येतात. इथलंच छोटसं गाव आहे झुंझुनूं. महालांचे शहर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. येथे अनेक राजवाडे आहेत ते पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे या गावातील अनेक तरुणांनी आता त्यांच्या भाषा आत्मसात केल्या आहे. येथले अनेक तरुण अशिक्षित आहेत. स्थानिक कलाकुसरींच्या वस्तू, खाद्यपदार्थांची विक्री करून हे तरूण आपले पोट भरायचे. पण येथे येणा-या पर्यटकांशी संवाद साधताना मात्र त्यांना अनेक समस्या यायला लागल्या. सुरुवातीला फक्त हातवारे करून ते आपले सामान विकायचे पण या मार्गाने आपली प्रगती कधीच व्हायची नाही हेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे हळूहळू त्यांनी वेगवेगळया भाषा शिकायचा प्रयत्न केला. आज या भागात अनेक अशिक्षित तरुण आहेत ज्यांना इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच अशा अनेक भाषा बोलता येतात. पूर्वी रस्त्याच्या कडेला वस्तू विकणारे हे तरूण आता टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात.