फेब्रुवारी २०२३ हा मगाच्या १२२ वर्षांमधला सर्वात उष्ण महिना ठरला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये अंगाची लाही होऊ लागलीच होती. फेब्रुवारी महिन्यातच एप्रिल-मे सारखं वातावरण जाणवत होतंच अशात आता IMD ने दिलेल्या महितीनुसार १२२ वर्षांमध्ये हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १९०१ नंतर फेब्रुवारीत पहिल्यांदाच पारा इतका वाढला की १२२ वर्षात हा महिना इतका उष्ण ठरला आहे. १९८१ ते २०१० या कालावधीत वाढलेलं तापमान हे सर्वसाधारण होतं.
देशाच्या अनेक भागांमध्ये अधिक तीव्रतेच्या तापमानाची नोंद होते आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जेवढं तापमान असते ते तापमान फेब्रुवारीतच वाढल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही पाच दिवसांपूर्वी हेदेखील हवामान विभागाने हे स्पष्ट केलं होतं की पुढील पाच दिवसांमध्ये वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान हे तीन ते पाच अंशांनी जास्त असणार आहे. पाच दिवसांपूर्वी हा इशारा दिलेला असतानाच आता ही माहिती समोर आली आहे.
१९८१ ते २०२० या तीस वर्षांच्या कालावधीत फेब्रुवारी महिन्यात भारतात तापमान किती होते? याच्या तपशीलावर नजर मारली असता असे निदर्शनास येते की मागचे तीस वर्ष फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान हे २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहत होते. तर किमान तापमान हे १५ अंशांच्या आसपास राहायचे. ही आकडेवारी आतापर्यंत सामान्य मानली जात होती. अर्थात प्रत्येक प्रदेशानुसार या आकडेवारीत थोडेफार बदल व्हायचे. वायव्य, पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये सामान्य तापमान अधिक असते.
ला निनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे उष्णतेची लाट पसरतेय?
जागतिक स्तरावर हे वर्ष मागील दोन वर्षांपेक्षा थोडे अधिक गरम असण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ला निनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर एल निनोचा थेट परिणाम होतो. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ बालयेशू किंवा छोटा मुलगा तर ‘ला निना’ म्हणजेच लहान मुलगी असा होतो. उष्णकटिबंधातील पश्चिम-प्रशांत महासागराचे पाणी नेहमीपेक्षा थंड झाल्यावर ला-निना प्रभावी होतो. ‘ला निना’ वर्षांत दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये भरपूर पाऊस पडतो. एल निनो व ला निना या दोन प्रभावांचा संपूर्ण जगाचे जल-वायुमान ठरवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. ला निना परिस्थितीमुळे पृथ्वीच्या वातावरणावरही तात्पुरता थंड प्रभाव पडतो.