ग्लोबल वॉर्मिंग आणि जागतिकीकरण या संकल्पनांबाबत एकीकडे बोलत असताना दुसरीकडे मात्र पृथ्वीच्या होत असणाऱ्या नाशाकडे मात्र आपले दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे. जगातील विविध देशांमध्ये निर्माण होत असलेल्या प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होत असणारा नाश येणाऱ्या काळातील धोक्याची घंटा आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, मागील ६५ वर्षांत जगभरात ८.३ अब्ज टन इतक्या मोठ्याप्रमाणात प्लास्टिकचं उत्पादन झालं आहे.
प्लास्टिकच्या वस्तू फारच कमी कालावधीसाठी वापरून नंतर त्या फेकून दिल्या जातात. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा होण्याचे प्रमाण जास्त आहे. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. गेयर यांच्यासोबत पर्यावरणतज्ज्ञ सेंट बार्बरा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी ‘सायन्स अॅडव्हान्स’ या जर्नलमध्ये एक शोध निबंध सादर केला. यातून अतिशय धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आतापर्यंत निर्माण झालेल्या ८.३ अब्ज टन प्लास्टिकपैकी अर्ध्याहून अधिक प्लास्टिक हे मागील १३ वर्षांत निर्माण झाला आहे. यातील ७९ टक्के प्लास्टिक कचरा अजूनही जमा आहे. यातील ९ टक्के प्लास्टिक पुनर्वापरासाठी उपयोगी आले असून १२ टक्के जाळून टाकण्यात यश आले आहे. मात्र जाळल्यामुळे झालेले वायूप्रदूषण वेगळेच.
जॉर्जिया युनिव्हर्सिटीच्या जेना जॅमबेक आणि सी एज्युकेशन असोसिएशनच्या कॅरा लवेंडर लॉ यांनी केलेल्या अभ्यासानुसार, सागरी किनारपट्टीवर दरवर्षी आठ दशलक्ष टन एवढा कचरा प्लास्टिकमुळे साचलेला दिसून येतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि आता उपलब्ध असलेल्या प्लास्टिकचा जास्तीत जास्त पुनर्वापर कसा होईल याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.