पैसे कमवण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो असं अनेकदा सांगितलं जातं. तरीही अनेक लोक पैशाच्या आमिषाला बळी पडतात आणि स्वत:ची फसवणूक करुन घेतात. शिवाय काही लोक पैसा कमवाण्यासाठी अंधश्रद्धेलाही बळी पडतात. याबाबतच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका तांत्रिकाने पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून एका व्यक्तीला अडीच लाखांचा गंडा घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना छत्तीसगडच्या बलौदा मार्केटमध्ये घडली आहे. एका तांत्रिकाने रामगोपाल साहू नावाच्या व्यक्तीला पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली त्याच्याकडून अडीच लाख रुपये घेतले आणि तो फरार झाला. या तांत्रिकाने रामगोपाल याला मंत्रांद्वारे आकाशातून दुप्पट पैशांचा पाऊस पाडतो असं सांगितलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीनदयाल नावाचा एक तांत्रिक त्याच्या मुलासह बलौदा बाजार येथे राहणाऱ्या रामगोपाल साहू यांच्याकडे आला आणि या पिता-पुत्रांनी रामगोपालला सांगितलं की, तो जेवढे पैसे देईल त्याच्या दुप्पट पैसे परत मिळतील. शिवाय हे पैसे आकाशातून पैशांचा पाऊस पाडून त्याला हे पैसे दिले जातील असंही तांत्रिकाने सांगितलं होतं. शिवाय तांत्रिकाने एक मंत्र दिला आणि सांगितलं जेव्हा या मंत्राचा जप कराल तेव्हा तेव्हा पैशांचा पाऊस पडेल.
रिपोर्ट्सनुसार, ही घटना मागील वर्षी दिवाळीआधी घडली होती. यानंतर रामगोपालने तांत्रिकांच्या म्हणण्यानुसार त्याला आतापर्यंत अडीच लाख रुपये दिले आहेत. जेव्हा तो तांत्रिक आणि त्याचा मुलगा पळून गेला तेव्हा रामगोपालला आपली फसवणूक झाल्याचं समजलं. फसवणुकीनंतर त्यांने लगेच पलारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधीक्षक दीपक कुमार झा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, बनावट तांत्रिक आणि त्याचा मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दीनदयाल आणि पुरुषोत्तम अशी या दोघांची नावे असून त्यांना न्यायालयीन कोठडीत देण्यात आली आहे. तसेच लोकांनी तांत्रिक, बाबा, जादू यांच्या फंदात पडू नये, अन्यथा त्यांचीही अशीच फसवणूक होऊ शकते.